मालेगावी शाळा-महाविद्यालयांना आजपासून पुन्हा टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:35+5:302021-03-09T04:17:35+5:30
महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. शाळा-महाविद्यालयांत गर्दी होत असल्याच्या तक्रारी काही सामाजिक संस्था, ...
महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. शाळा-महाविद्यालयांत गर्दी होत असल्याच्या तक्रारी काही सामाजिक संस्था, संघटनांनी व नागरिकांनी केल्या आहेत. याची दखल घेत सोमवारी (दि.८) महापालिकेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त दीपक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, सहायक आयुक्त, कमरुद्दीन शेख, राजू खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा महाविद्यालये, उच्च महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच लग्न समारंभांनाही गर्दी वाढत आहे. यापुढे लग्नसमारंभासाठी प्रभाग अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अत्यावश्यक राहणार आहे. ५० जणांच्या उपस्थितीतच लग्नसमारंभ पार पाडणे बंधनकारक राहणार आहे. कोरोना पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. साहरा रुग्णालयात दोनशे खाटांची व्यवस्था आहे, तर हज व दिलावर खान सभागृहात प्रत्येकी चाळीस खाटा उपलब्ध आहेत. शहरात सद्य:स्थितीत ६६ रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे उपायुक्त कापडणीस यांनी सांगितले.
कोट....
विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या उपाययोजना केल्या जात आहेत. मालेगावातच नाही तर राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाच्या निर्देशानुसारच महापालिका क्षेत्रातील शाळा व महाविद्यालय, कोचिंग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर शेख यांनी केले आहे.
- ताहेरा शेख, महापौर, मालेगाव