सटाणा पंचायत समितीला लावले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 08:41 PM2021-03-16T20:41:01+5:302021-03-16T20:46:37+5:30
सटाणा : बागलाण पंचायत समितीमधील लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी अकार्यक्षम असून, कार्यालयीन कामकाज वेळेत उपस्थितीत राहात नसल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लाऊन ठिय्या आंदोलन केले.
सटाणा : बागलाण पंचायत समितीमधील लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी अकार्यक्षम असून, कार्यालयीन कामकाज वेळेत उपस्थितीत राहात नसल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लाऊन ठिय्या आंदोलन केले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीद्वारे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बागलाण पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता कुलूप लावले.
जलसंधारण विभागाचे अधिकारी कार्यालयाच्या निर्धारित वेळेत उपस्थितीत राहात नाहीत. भेटावयास गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. शेतकऱ्यांचे समाधान न करता, त्यांना माघारी पाठवितात. चिरीमिरी मागण्याचा प्रयत्न होतो. अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली करावी, यासाठी सुमारे तासभर प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गटविकास अधिकारी कार्यालयीन कामकाजासाठी लखमापूर येथे दौऱ्यावर असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राकेश सोनवणे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. आंदोलनाविषयीची संपूर्ण माहिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली.
संबंधित जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करावी, अन्यथा आठ दिवसांनंतर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला. कार्यालयीन अधीक्षकांकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले.
त्यानंतर, योग्य कारवाई करू, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उमेश आहिरे, उदय नेरकर, वैभव बिरारी, शुभम खैरणा, जावेद कुरेशी, शोएब शेख, आकाश ठाकरे, तेजस शेवाळे, सनी ठाकरे, विजय शिंदे, गौरव आहीरे, दानिश शेख, मनोज जाधव यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.