प्लॅस्टिक टाळा; डस्टबिन वापरा
By admin | Published: September 19, 2015 10:38 PM2015-09-19T22:38:33+5:302015-09-19T22:39:11+5:30
आवाहन : राज्य शासनाकडून लघुसंदेशामार्फत जागृती
नाशिक : हरित कुंभमेळा संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्याच्या अखेरच्या तिसऱ्या शाहीस्नानाच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांकडून राज्य शासनामार्फत भाविकांना प्लॅस्टिक टाळा; डस्टबिन वापरा असा लघुसंदेश पाठविण्यात येत होता. प्रदूषण रोखण्यासाठी अन् पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शासनाकडून कुंभमेळ्यानिमित्त आलेल्या भाविकांमध्ये लघुसंदेशामार्फत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘महाराष्ट्र सरकार आपका कुंभनगरी में स्वागत करती हैं, बस सुविधा बाह्यस्थानक से उपलब्ध हैं’ ‘प्लॅस्टिक मत वापरना, कुडादान का प्रयोग करे’ असे हिंदी-इंग्रजी भाषेतून लघुसंदेश विविध नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचविले जात होते. राज्य शासनाकडून या जागृतीपर संदेशाबरोबरच भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मदतवाहिनी क्रमांकही लघुसंदेशामध्ये देण्यात आले होते.
भाविकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास मदत व्हावी या हेतूने लघुसंदेशामार्फत जनजागृती करण्यावर भर दिला गेला. शाहीस्नानाच्या तीनही पर्वण्यांच्या दिवशी राज्यशासनामार्फत भ्रमणध्वनीच्या नेटवर्कची सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांकडून पर्यावरणपूरक जनजागृतीपर लघुसंदेश पाठविण्यात आले. संवाद साधण्याची सुलभ साधने या आधुनिकतेच्या युगात उपलब्ध झाली असून त्यामार्फत एकाचवेळी अनेकांशी थेट संवाद साधता येणे शक्य झाले आहे. याचा फायदा कुंभमेळ्यामध्ये दिसून
आला.
सोशल मीडियाचे शासकीय यंत्रणेकडून विविध ‘ग्रुप’ तयार करून त्याद्वारे आपआपसांमध्ये संवाद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच राज्यशासनाचे प्रबोधनात्मक लघुसंदेशही आधुनिकतेचा वापर करत विविध कंपन्यांनी आपआपल्या ग्राहकांपर्यंत शासनाचा ‘संदेश’ पोहचविला.