मिनी मंत्रालय टळले, गावचे ‘मुखिया’ बनले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:48+5:302021-02-10T04:14:48+5:30
हिसवळ खुर्द येथील कैलास फुलमाळी यांनी पत्नीला जिल्हा परिषदेत पाठविण्याचे स्वप्न पाहिले, मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याने पूर्ण झाले नाही. ...
हिसवळ खुर्द येथील कैलास फुलमाळी यांनी पत्नीला जिल्हा परिषदेत पाठविण्याचे स्वप्न पाहिले, मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याने पूर्ण झाले नाही. म्हणून नाउमेद न होता, किमान ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची आकांक्षा बाळगली आणि तशी संधीदेखील चालून आली.
सोडतीत अनुसूचित जातीसाठी सरपंचपद राखीव झाले. कैलास फुलमाळी हे अनुसूचित जातीतून निवडून आलेले एकमेव उमेदवार असल्याने पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची केवळ औपचारिकता उरली आहे. कैलास (४६) यांचे शिक्षण एम. ए. भोसला मिल्ट्री कॉलेज नाशिक येथून झाले असून ते प्रगतशील शेतकरी आहेत.
गावाच्या विकासाच्या त्यांच्या कल्पना सुस्पष्ट आहेत. संधी अनेकदा वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येते. मिळालेल्या संधीचे शंभर टक्के सोने करणार, तरुणांसाठी वाचनालय, व्यायामशाळा, पाणी सोय, स्वच्छता हे अग्रक्रम असणार आहेत. कारण आपण विकासासाठी राजकारणात उतरलो आहे असे कैलास फुलमाळी यांचे म्हणणे आहे. पत्नी छाया यांना जिल्हा परिषदेत संधी मिळाली नसली तरी गावाची सेवा करण्याची संधी माझ्या पतीला मिळाली यात आनंद आहे असे सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची पत्नी छाया कैलास फुलमाळी यांना भाजपच्या तिकिटाची अपेक्षा होती. पण तिकिटाच्या जवळ येऊन ही त्यांची संधी हुकली. ते तिकीट हिसवळ बु.च्या आशा जगताप यांना मिळाले आणि त्या ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत निवडून आल्या. नाही मिनी मंत्रालयात तर किमान गावचा मुखिया होण्याची स्वप्न फुलमाळी कुटुंबाने बाळगली व त्यांना नशिबानेही साथ दिली. हिसवळ बु. व हिसवळ खुर्द हे दीड किमी अंतरावर आहेत. मोहेगाव ग्रामपंचायतीमध्ये ९ पैकी ७ जागांवर फुलमाळी यांचे सहकारी निवडून आले आहेत. मोहेगावची निरक्षर सुमनबाई असो की, हिसवळ खुर्दचे पदव्युत्तर शिक्षण झालेले कैलास माळी हे दोघेही सरपंचपदाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दोघांची भावना एकच आहे, ती म्हणजे गावाचा विकास.
===Photopath===
090221\09nsk_6_09022021_13.jpg
===Caption===
कैलास फुलमाळी