ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कारवाईस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:44 AM2018-05-12T00:44:05+5:302018-05-12T00:44:05+5:30
सोयगाव भागातील जयराम नगर, शांतिनगर, सप्तशृंगी पार्क या भागात असलेल्या सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय परिसरात लग्नसोहळ्यात वाजणारे डीजे व कर्णकर्कश वाद्य यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायदेशीर कारवाई करण्यास कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे व पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. यामुळे नागरिकांनी थेट अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन तक्रार करीत कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव : सोयगाव भागातील जयराम नगर, शांतिनगर, सप्तशृंगी पार्क या भागात असलेल्या सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय परिसरात लग्नसोहळ्यात वाजणारे डीजे व कर्णकर्कश वाद्य यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायदेशीर कारवाई करण्यास कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे व पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. यामुळे नागरिकांनी थेट अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन तक्रार करीत कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सोयगाव परिसरातील नागरी वसाहतीत सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय आहेत. ध्वनिप्रदूषण व वाहतूक समस्या यामुळे येथील रहिवाशांना त्रास होतो. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येतात. डीजेच्या आवाजामुळे इमारतीचे दरवाजे, खिडक्या, तावदाने यांना हादरे बसतात. डीजेचा आवाज इतका प्रचंड असतो की जोपर्यंत डीजे वाजत असतो, तोपर्यंत घरातील लोकांना परस्परांचे बोलणे ऐकू येत नाही. या आवाजाचा वृद्धांच्या हृदयाला त्रास होतो. प्रचंड प्रमाणातील ध्वनिप्रदूषणामुळे येथे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी डीजे मालक, लग्नाला येणारी वºहाडी मंडळी व स्थानिक रहिवासी यांच्यात वाद वाढले आहेत. याविषयी रहिवाशांच्या शिष्टमंडळाने दि. १९ एप्रिल रोजी कॅम्प पोलीस उपअधीक्षक हगवणे यांना निवेदन देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण संदर्भात दिलेल्या निकालानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी हगवणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु नंतर प्रत्यक्ष वाद्य व डीजेवर कारवाई होण्याऐवजी परिसरात जाणीवपूर्वक दीर्घकाळ वाद्य वाजवले जात असल्याचे नागरिकांच्या अनुभवास आले. रहिवासी नागरिकांनी पुन्हा दि.२ मे रोजी हगवणे यांची भेट घेतली. त्यांनी कॅम्प पोलीस निरीक्षकांना कारवाईच्या सूचना केल्या, परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यास पोलिसांकडून होणारी टाळाटाळ संशयास्पद ठरली आहे. २ हजार लोकसंख्येच्या नागरिकांची मागणी दखल घेतली गेली नसल्याने संतप्त रहिवाशांनी थेट अपर पोलीस अधीक्षक पोद्दार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात दिनेश ठाकरे, प्रशांत बच्छाव, माणिक कदम, राजेंद्र निकम, रोशन देवरे, गोरख शेवाळे, विलास वानखेडे, एन.ए. पाटील आदींचा समावेश होता.