महापालिकेला खडबडून जाग
By admin | Published: July 2, 2014 11:51 PM2014-07-02T23:51:05+5:302014-07-03T00:23:33+5:30
महापालिकेला खडबडून जाग
नाशिक : पावसाळा सुरू होत असतानाही सुस्त असलेल्या पालिका प्रशासनाला शहराच्या एकाच भागात सहा संशयित डेंग्यू रुग्ण आढळताच खडबडून जाग आली आहे. अशोका मार्गावर पालिकेच्या आरोग्य पथकाने भेट देऊन साफसफाई केली, तसेच डासांची उत्पत्तीस्थाने आढळलेल्या बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे पंचवटीतही एक रुग्ण आढळल्यानंतर महापौर अॅड. यतिन वाघ यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन झाडाझडती घेतली.
अशोका मार्ग येथील रॉयल कॉलनीत काल डेंग्यूचे संशयित सहा रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका बालिकेची प्रकृती चिंताजनक आहे. उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्याच प्रभागात हा प्रकार घडल्याने पालिकेवर टीका होऊ लागली. त्याचबरोबर पंचवटीत रुग्ण आढळल्याने महापौर अॅड. यतिन वाघ यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि स्वच्छतेच्या कामाविषयी विचारणा केली. गेल्यावर्षी जून महिन्यात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले होते. यंदा गेल्या महिन्यात चार रुग्ण आढळले होते. आणि आता जुलै महिन्यात सहा संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्याची माहिती जीवशास्त्रज्ञ वैशाली पाटील यांनी दिली. आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली. संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तर महासभेत ठरल्यानुसार अतिरिक्त सफाई कामगार अन्य विभागांत वर्ग का झाले नाही, याची विचारणा महापौरांनी केली. सफाई कामगारांच्या बदल्यांचे अधिकार आरोग्याधिकाऱ्यांचे असताना बदल्यांची फाईल आयुक्तांकडे का गेली, असे अनेक प्रश्न महापौरांनी विचारले. पश्चिम विभागात सुमारे तीनशे ते चारशे सफाई कामगार असून, आपल्या प्रभागात तर ७० सफाई कामगार आहेत. अतिरिक्त सफाई कामगारांना अन्य विभागांत नियुक्त करा, असे आदेश त्यांनी दिले. १७ सफाई कामगारांच्या आवश्यक त्या ठिकाणी बदल्या करण्यात येत असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील आरोग्याधिकारी डॉ. बुकाणे, जीवशास्त्रज्ञ डॉ. पाटील तसेच नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांची बैठक घेतली. अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौरांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)