आदिशक्तीचा आजपासून जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:18 AM2019-09-29T00:18:34+5:302019-09-29T00:18:54+5:30
नाशिक : शक्तीरूपातील देवीचे पूजन आणि सृजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज ...
नाशिक : शक्तीरूपातील देवीचे पूजन आणि सृजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. देवीच्या मूर्ती अथवा प्रतिमेसमोर घट मांडून धान्य पेरून नंदादीप लावून पूजन करण्यात येणार आहे.
पितृपंधरवडा संपताच घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करण्यासाठी मातीच्या घटामध्ये धान्य पेरले जाते.
तसेच देवीसमोर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती हे
सारे सोपस्कार केले जातात. प्रत्येक घराची पद्धत विभिन्न असते. कुणाकडे कुमारीकेचे पूजन आणि
भोजन, कुठे सवाष्ण भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन पूर्णाहुती म्हणून पुरणाचा स्वयंपाक केला जातो. काही घरांमधील कुटुंबप्रमुख नऊ दिवस उपवास करून केवळ फलाहार करतात.
दरम्यान, पाटावर हत्ती काढून, त्याच्याभोवती बालमैत्रिणींसह फेर धरून, गाणी म्हणत भोंडला खेळण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये पाळली जाते.
शक्तिरुपाचे पूजन
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तीरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते.