संस्कृत भाषा सभेकडून पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:04 AM2019-04-24T01:04:30+5:302019-04-24T01:04:43+5:30
येथील सुमारे ४८ वर्षे जुनी संस्कृत भाषा सभा या संस्थेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नाशिक : येथील सुमारे ४८ वर्षे जुनी संस्कृत भाषा सभा या संस्थेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंगळवारी (दि.२३) समारंभपूर्वक पुरस्कार वितरण करून मान्यवर पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला.
परशुराम साईखेडकर सभागृहात सभेच्या वतीने ४८व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. देवदत्त देशमुख, सरिता देशमुख, तेजश्री वेदविख्यात, शोभा सोनवणे यांच्यासह पुरस्कारार्थी उपस्थित होते. याप्रसंगी सचिन जोशी, जयंत गायधनी, रूपाली झोडगेकर, श्रीमती वर्णा यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, मेंदूच्या विकासासाठी बालकांना बालवयातच संस्कृत भाषेचे श्लोक, सुभाषितांचे संस्काराची गरज आहे. संस्कृत भाषा लहान मुलांच्या बुद्धीमत्तेचा विकास घडवून आणण्यास मदत करते. त्यामुळे लहान वयातच मुलांवर संस्कृतचे संस्कार पालकांकडून होणे आवश्यक आहे. प्रास्ताविक देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नूपुर सावजी, डॉ. अभिजित सराफ यांनी केले.
रंजक सादरीकरणाने जिंकली मने
नाट्यहोत्र या हौशी संस्कृत नाट्यसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे यांनी लिहिलेल्या कथेचे नाट्यरूपांतर ‘अहमेव ते वहिदा’ या एकांकिकेचे रंजक सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. महिमा ठोंबरे दिग्दर्शित या एकांकिकेचा प्रयोग चांगलाच रंगला. रमाकांत नावाच्या सरकारी नोकराला एकदा अचानक अभिनेत्री वहिदा रहेमानचे पत्र येते अन् मग संपूर्ण चाळीत एकच गोंधळ उडतो. त्यामुळे चार वर्षांपूर्वीच विवाह करून आलेल्या रमाकांतची पत्नी रमाची मोठी घालमेल होऊन गोंधळाची अवस्था होते. चाळीत राहणाऱ्यांकडूनही वेगवेगळे चित्र या परिस्थितीवरून उभे केले जाते, याभोवती कथानक फिरते.