‘अंनिस’कार्यकर्त्याच्या जागरूकतेने ‘भाग्यरत्न’विक्रीची भोंदूगिरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 07:45 PM2020-02-02T19:45:41+5:302020-02-02T19:53:38+5:30
महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला.
नाशिक : अंतर्गोल भिंगातून तळहातावरील रेषा पाहाण्याचा बहाणा करत कोणते भाग्यरत्न कसे फायदेशीर ठरेल हे खात्रीपुर्वक सांगून, फळ ज्योतिषावर विश्वास असणाऱ्या भोळ्याभाबड्यांकडून दहा रूपयांपासून पाचशे रूपयांपर्यंत ‘भाग्यरत्न’च्या अंगठ्या विक्री करणारा अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जाळ्यात अलगद अडकला. कार्यकर्त्याने जाब विचारत कानउघडणी केली असता त्या विक्रेत्याने सिन्नर तालुक्यातील दोडी गावाच्या बसस्थानकाजवळून आपला गाशा गुंडाळला.
महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. यावेळी त्याच्या ठिय्यावर दहा ते पंधरा गावकरी आपला तळहात दाखवून नशीब आजमावत होते. यावेळी त्यांनी कानोसा घेतला असता तो तरूणव्रिकेता स्वत:च नागरिकांची राशी ठरवित असल्याचे लक्षात आले. कोणते भाग्यरत्न त्या व्यक्तीला लाभदायक आहे, हे पटवून सांगत माथी मारण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. या सगळ्या प्रकाराचे निरिक्षकण करत गोराणे यांनी त्या विक्रेत्याला काही प्रश्न विचारले. ‘तुझे भाग्य फुलविणारे भाग्यरत्नाची अंगठी तू स्वत: घाल आणि भाग्य उजळवून घे, या गोरगरीब भोळ्याभाबड्या गावकऱ्यांना का फसवितो’ असा जाब विचारताच त्याने काही ग्राहकांना विक्री केलेल्या अंगठ्या पुन्हा घेत त्यांचे पैसे परत केले आणि आपला गाशा गुंडाळला. यावेळी कोणीतही तक्रारदार पुढे न आल्याने त्याच्याविरूध्द कायदेशीर कारवाई यावेळी करता आली नाही, असे गोराणे यांनी यावेळी सांगितले.