विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:26 PM2020-01-09T23:26:52+5:302020-01-09T23:27:21+5:30
महाराष्ट्र पोलीस आरोहण (रेझिंग डे) दिन सप्ताहनिमित्त वाहतूक नियमांचे पालन व वाहतूक नियमांची नागरिकांना माहिती व्हावी संदर्भात जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढण्यात आली.
मालेगाव : महाराष्ट्र पोलीस आरोहण (रेझिंग डे) दिन सप्ताहनिमित्त वाहतूक नियमांचे पालन व वाहतूक नियमांची नागरिकांना माहिती व्हावी संदर्भात जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढण्यात आली.
नियंत्रण कक्ष येथून फेरी निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसम पूलमार्गे संगमेश्वर, रामसेतू पूल, गूळ बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे परत नियंत्रण कक्ष येथे आली. शहा विद्यालय व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय, काकाणी विद्यालय, आरबीएच कन्या विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल आदी शालेय विद्यार्थी होते. फेरीदरम्यान हेल्मेट नेहमी वापरा, आवरा वेगाला सावरा जिवाला, अति घाई संकटात नेई, नजर हटी दर्घटना घटी आदी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. नियंत्रण कक्षात महामार्ग पोलीस केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृष्णा गोपनारायन, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी विद्यार्थिनींना नवीन आलेली इंटर सेप्टर वाहनाद्वारे कशी कारवाई होते. वाहतूक नियमासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र गोसावी, दिनेश जाधव, डी. बी. नवरे, विकास शिरोळे, केशव मोरे, मोहन आहेर, ओंकार शेरे, प्रभाकर सोनवणे, कृष्णा ढगे, पंकज दराडे, नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते.