निरोगी जीवनाबाबत समाजात सजगता आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:29+5:302021-05-06T04:16:29+5:30
नाशिक : सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे, यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेऊन कार्य ...
नाशिक : सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे, यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेऊन कार्य करणे महत्त्वपूर्ण आहे, असे मनोगत ज्येष्ठ समाजसेवक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.भरत माेटवाणी यांच्यासह अन्य मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड १९ आजारासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित या ऑनलाइन कार्यशाळेत या कार्यशाळेत डॉ.भरत वाटवाणी यांच्यासह सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विजय सुरासे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. भरत वाटवाणी यांनी आरोग्य शिक्षणातील सर्वांनी समाजभान जागृत ठेऊन कार्य करावे. रुग्णांशी आदराने वागावे, तसेच भावनिक नाते जोडावे. काम करताना प्रतिसादाकडे न पाहता सहानुभूतीने वागावे, तरच काम केल्याचे समाधान मिळते, असे मत व्यक्त केले. सध्याची कोविड१९ आजाराची स्थितीही लवकरच बदलेल, यासाठी आपण खंबीर राहून कार्य करावे. आपली प्रबळ इच्छाशक्ती व सकारात्मतेने कार्य केल्यास नक्कीच यश मिळते, असे त्यांनी सांगितले. डॉ.विजय सुरासे यांनी कोविडचा प्रभाव पुढील काही दिवसात कमी होईल. याबद्दल सोशल मीडियावरील बनावट न्यूज, संदेश पाहून घाबरू नका. आपल्यातील सकारात्मक विचारांचे आदान-प्रदान मोठया प्रमाणात करा. कुटुंबातील व्यक्ती, समाजातील रुग्ण यांच्याशी संवाद साधा. संवादाने नकारात्मक विचारांचे उच्चाटन होते, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी प्रास्ताविकात आरोग्य क्षेत्रातील लोकांचे कोविडविरुद्धच्या लढयात महत्त्वपूर्ण योगदान आहे. आरोग्यसेवांचे कार्य पाहता कोविडची परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे सांगितले, तर कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे कार्यशाळेचे सूत्रसंचलन केले.