पारंपरिक शेतीमुळे प्रक्रिया उद्योगापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:23+5:302021-09-18T04:15:23+5:30
श्याम खैरनार, सुरगाणा : तालुक्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून हिवाळ्यात रब्बी तर पावसाळी हंगामात खरीप पिके ...
श्याम खैरनार, सुरगाणा : तालुक्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून हिवाळ्यात रब्बी तर पावसाळी हंगामात खरीप पिके घेतली जातात. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे असे अनेक जण बारमाही शेती करतात. तालुक्यात प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामातील पीक केले जाते. तालुक्यात अजूनही पारंपरिक शेतीवरच भर दिला जात असून प्रक्रिया उद्योगांना त्यामुळे चालना मिळू शकलेली नाही. खरीप हंगामात विविध प्रकारचा भात, नागली, वरई, उडीद या प्रमुख पिकांसह नंतर भुईमूग, खुरासणी, काही प्रमाणात सोयाबीन, तूर, कुळीद इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांसाठी पावसाचे पाणी, नदी, नाले, बोअरवेल, विहिरी याद्वारे पाण्याचा स्रोत उपलब्ध होतो.
सद्यस्थितीत भात २,५०० रुपये, नागली ४,००० रुपये, वरई ५००० रुपये, उडीद ५००० रुपये याप्रमाणे भाव आहेत.
शासनाने अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिके, क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन योजना, फळबाग लागवड आदी योजना राबविल्या आहेत. या पीक उत्पादनाला बाजार समिती सुविधाद्वारे किमान आधारभूत किमतीमध्ये खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळतो. धान्य साठवणुकीसाठी शासनाने नवीन मोठे गोडावून बांधकाम केले आहे.
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पीक कापणी प्रयोग व उंबरठा उत्पन्नाच्या आधारे पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. सुरगाणा तालुक्यात २०२१ मध्ये खरीप हंगामात ४ हजार २४५ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. तालुक्यात सद्यस्थितीत भात - १८५०० हेक्टर, नागली - ४२७० हेक्टर, वरई - ४०८३ हेक्टर, उडीद - १,०१६ हेक्टर याप्रमाणे लागवडीखालील क्षेत्र आहे.
आदिवासी तालुका असल्यामुळे प्रक्रिया उद्योग व निर्यातक्षम पिके नाहीत.
कोट...
सुरगाणा तालुक्यात भात, नागली, वरई, इत्यादी प्रमुख नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. कृषी विभागामार्फत पिकांचे उत्पादन वाढविणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
- प्रशांत रहाणे
तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा.
फोटो- १७ सुरगाणा खबरबात
170921\17nsk_20_17092021_13.jpg
फोटो- १७ सुरगाणा खबरबात