अक्सा कॉलनी : पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संताप

By admin | Published: June 1, 2015 10:28 PM2015-06-01T22:28:36+5:302015-06-02T00:16:07+5:30

घरफोडीच्या सत्राने घबराट

Axa Colony: The anger caused by the inaction of the police | अक्सा कॉलनी : पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संताप

अक्सा कॉलनी : पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संताप

Next

मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनी भागात गेल्या दोन महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरूच असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अक्सा कॉलनी भागात घरफोड्या सुरू आहेत. या भागात रस्ता, गटारींची कामे नुकतीच झाल्याने लोकांचा संबंधित चोरट्यांवर संशय आहे.
गेल्या महिन्यात डॉ. रज्जाक पटेल आणि जुबेर खाटिक या एटीटी विद्यालयातील शिक्षकांच्या घरी चोरी झाली. खाटिक कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याची संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत रोकड व ऐवज लुटून नेला होता, तर डॉ. रज्जाक पटेल हे आपल्या मुलाकडे बाहेरगावी गेल्याची संधी साधत रात्रीतून चोरट्यांनी घरफोडी करीत हात साफ केला. दोघांची घरे एकाच गल्लीत समोरासमोर असून, त्यांच्याकडे चोऱ्या झाल्या. नंतर अक्सा कॉलनीतच नुरा सय्यद यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना त्यांच्या घरातील आजारी असलेल्या लहान मुलांना उपचारासाठी दवाखान्यात अ‍ॅडमिट केले असल्याची संधी साधून तेथेही चोरट्यांनी हात साफ केला.
काल रविवारी सायंकाळी याच भागात इक्बाल सौदागर यांच्या घरातून चोरट्यांनी सव्वा
लाखाची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. सौदागर हे जालना येथे नातेवाइकांकडे गेले होते. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
परिसरातील गुलाबपार्क भागातून पाण्याच्या टाकीखालून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली होती; मात्र पवारवाडी पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी शोध लावून ‘दुचाकी’ परत मिळवून दिली; मात्र आयेशानगर पोलिसांनाच चोर हात दाखवत असल्याने नागरिक संतप्त असून, पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Axa Colony: The anger caused by the inaction of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.