आय-२० कार झाडावर आदळून चक्काचूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:32 AM2017-07-26T00:32:11+5:302017-07-26T00:32:26+5:30
नाशिक : पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव आय- २० कार झाडावर आदळून कारमधील तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़२५) पहाटे त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव आय- २० कार झाडावर आदळून कारमधील तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़२५) पहाटे त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ घडली़ भरधाव कार धोपावकर कॉर्नरच्या संरक्षक जाळ्या तोडून झाडावर जाऊन आदळली. यामुळे या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला़ सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून यातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास सातपूरकडून हुंडाई कंपनीची लाल रंगांची आय-२० कार (एमएच १५, एफएफ २९२४) भरधाव आली़ या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती वेद मंदिराच्या समोरील धोपावकर कॉर्नरकडे वळाली व संरक्षक जाळ्या तोडून झाडावर जाऊन आदळली़ यामुळे झालेल्या जोरदार आवाजामुळे आसपासचे रहिवासी जागे झाले असता कार झाडाला आदळल्याचे दिसले़ त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली असता काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कारला बाहेर काढून त्यातील जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले़ मात्र जखमींच्या सांगण्यावरून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले़ या अपघात प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती़