वाढीव वीजबिलाच्या विरोधात आयमा सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:45 PM2020-08-22T22:45:26+5:302020-08-23T00:17:09+5:30
सिडको : उद्योगांचा स्थिर मागणी आकार लॉकडाऊनच्या काळापासून पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, उद्योगांना लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी मुदत (विनाव्याज व विलंब आकार) द्यावी आदींसह विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आयमा - निमाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
न्युज नेटवर्क

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयमातर्फे वीज बिलांसह प्रमुख चार मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अंदाजे १५०हून अधिक औद्योगिक संघटनांनी समान मागण्यांची निवेदने दिली आहेत. लघुदाब उद्योगांची पॉवर फॅक्टर पॅनल्टी २२ मार्चपासून पुढील ६ महिन्यांसाठी रद्द करावी, उच्चदाब उद्योगांचे बिलींग मार्च २०२० अखेर एक वर्षासाठी रद्द करण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. राज्य सरकार व महावितरण कंपनीने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशीही मागणी राज्य सरकार व महावितरण कंपनीकडे केली आहे. याप्रसंगी आयमा अध्यक्ष वरूण तलवार, धनंजय बेळे, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, विनीत पोळ, आशिष नहार, संदीप भदाणे, मनीष कोठारी उपस्थित होते. उद्योजकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नी अनेक दिवसानंतर आयमा व निमाच्या शिष्टमंडळाने एकत्रितपणे निवेदन दिल्यामुळे उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडॉउनमुळे उद्योगांना मोठा फटका बसला असून, सरकारने उद्योजकाना वीजबिलामध्ये काही सवलत देण्याची मागणी विविध संघटनांनी यापूर्वीच केली आहे. मात्र त्यावर अद्याप काहीही निर्णय न झाल्याने अडचणीत असलेले उद्योजक धास्तावले आहेत.