अयोध्या निकालाचे शहरात शांततेत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 08:02 PM2019-11-09T20:02:46+5:302019-11-09T20:04:21+5:30
अयोध्या प्रकरणी न्यायालयाकडून कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर होण्याची व निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊन पोलीस प्रशासनाकडून दोन्ही समाजांत सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी शांतता कमिटी, मोहल्ला कमिट्यांच्या बैठका बोलावून सामाजिक सौहार्दता राखण्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होणार असल्याचे पाहून गेल्या काही दिवसांपासून शहरातील सामाजिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना शनिवारी यश आले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी राममंदिरात आरती करण्यात आली, तर मुस्लीम समाजबांधवांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखल्याने सर्वत्र शांतता व सलोख्याचे वातावरण दिसले तर दुसरीकडे सामान्य नागरिकांचे जनजीवनही सुरुळीत व शांततेत पार पाडले.
अयोध्या प्रकरणी न्यायालयाकडून कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर होण्याची व निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊन पोलीस प्रशासनाकडून दोन्ही समाजांत सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी शांतता कमिटी, मोहल्ला कमिट्यांच्या बैठका बोलावून सामाजिक सौहार्दता राखण्याचे तसेच देशाची एकता व बंधुता कायम ठेवण्याची शपथही घेण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. शनिवारी न्यायालय निर्णय देण्याचे जाहीर होताच, पोलीस यंत्रणेने शुक्रवारी रात्रीपासूनच दक्षता घेत असामाजिक तत्त्वांवर करडी नजर ठेवली व त्याचबरोबर शहरातील प्रमुख ठिकाणे, धार्मिकस्थळांभोवती पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे शनिवारी निर्णय जाहीर झाल्यानंतरही शहरातील जनजीवन सुरुळीत राहिले. काळाराम मंदिर, रविवार कारंजा येथील राममंदिर आदी ठिकाणी रामभक्तांकडून आरती करण्यात येऊन पेढे वाढण्यात आले. काळाराम मंदिरात दुपारी झालेल्या आरती प्रसंगी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावत श्रीरामाची पूजा केली. शहरातील पूर्व भागातही सर्वत्र शांतता व दैनंनदिन व्यवहार सुरुळीत होते, तर काही चौकांमध्ये सामाजिक सलोखा राखण्याचे सद्भावना फलक लावून नागरिकांना न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत व शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. शनिवारमुळे शाळा, महाविद्यालयांना अगोदरच सुट्या होत्या तर शासकीय व निमशासकीय कार्यालयेही बंद असल्याने रस्त्यांवरील वर्दळही काही प्रमाणात रोडावली होती. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवसभर ठिकठिकाणी भेटी दिल्या. त्यामुळे कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.