आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या नैराश्यातून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 01:58 AM2022-01-01T01:58:37+5:302022-01-01T01:58:56+5:30
हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्रुती सुरेश सानप (२२) या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री महाविद्यालयाला लागून असलेल्या वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी तपासात समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पंचवटी : हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्रुती सुरेश सानप (२२) या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री महाविद्यालयाला लागून असलेल्या वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी तपासात समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सानप राहत असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे तिचे मैत्रिणींचे जाबजबाब नोंदवून घेतले आहे. बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सानप हिने खासगी क्लास लावलेला होता.या क्लासची फी देय असल्याने ती गेल्या आठवड्यात आपल्या मूळ गावी बीड जिल्ह्यात आई वडिलांना भेटायला गेली होती. तेथून रेल्वेने परत येताना तिच्याकडे असलेले सहा हजार रुपये प्रवासात हरवल्याने ती काहीशी नाराज झालेली होती, पैसे हरवल्याने ती दोन दिवसांपासून नैराश्यात असल्याचे पोलिसांनी नोंदवून घेतलेल्या जबाबातून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थिनीने पैसे हरविल्याच्या कारणावरून नैराश्येपोटी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे. याबाबत गुन्हे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.