आयुर्वेद उपचार पद्धतीने रोगांवर नियंत्रण शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:32+5:302021-06-27T04:11:32+5:30
नाशिक : आयुर्वेद उपचार पध्दतीने विविध रोगांवर नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन ...
नाशिक : आयुर्वेद उपचार पध्दतीने विविध रोगांवर नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन विभागाचे सदस्य वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ संदर्भातील ऑनलाईन व्याख्यानमालेत ’आयुर्वेदा इन पोस्ट कोविड सिंड्रोम’ या विषयावर मार्गदर्शन करताना
ते बोलत होते. या ऑनलाईन व्याख्यानासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेस महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आशुतोष गुप्ता उपस्थित होते.
कोविड-१९ आजारानंतर होणारे इतर विविध व्याधी व आजार टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचारपध्दती परिणामकारक असल्याचे नमूद करतानाच विनोदकुमार यांनी कोविड -१९ आजार संपूर्ण वैद्यक विश्वापुढील आव्हान असून अशावेळी आयुर्वेद या पुरातन भारतीय वैद्यकशास्त्राच्या ज्ञान, अनुभव व संशोधनाच्या आधारे या आजाराशी कसा सामना करता येईल याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच आयुर्वेदातून शारिरीक व मानसिक व्याधींवर उपचार करणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले . डॉ. प्रदीप आवळे यांनी आभार मानले.