शस्त्रक्रियांच्या परवानगीने आयुर्वेदिक क्षेत्राला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:42+5:302020-12-15T04:31:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य आणि शालक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर पदवीधारकांना सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन ...

To the Ayurvedic field with the permission of surgery | शस्त्रक्रियांच्या परवानगीने आयुर्वेदिक क्षेत्राला

शस्त्रक्रियांच्या परवानगीने आयुर्वेदिक क्षेत्राला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य आणि शालक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर पदवीधारकांना सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून (सीसीआय) शस्त्रक्रियेबाबतची मान्यता देण्यात आल्याचे राजपत्र प्रकाशित झाले. सीसीआयच्या या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण असले तरी ॲलोपॅथी डॉक्टरांमध्ये नाराजी असून, त्यांच्याकडून अशा मिक्सोपॅथीला विरोध दर्शविण्यात आला आहे.

सीसीआयने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएच्या वतीने देशभरात बंददेखील पुकारण्यात आला होता. देशभरातील बहुतांश ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी दिवसभर त्यांचे काम बंद ठेवून निर्णयाला विरोध केला असला तरी त्यामुळे या निर्णयात कोणताही फरक पडलेला नाही. मात्र, त्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी आवश्यक असतानाही ती घेतली गेली नसल्याचा आक्षेप ॲलोपॅथी डॉक्टरांचा आहे. नाशिक आयएमएच्या सभासद २ हजार डॉक्टर्सनी दवाखाने, बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून निषेध नोंदवल्याने शासकीय रुग्णालयांमध्येदेखील केवळ बीएएमएस डॉक्टरांची सेवा दिली. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील सेवेवरदेखील परिणाम झाला होता. तसेच राज्यभरातील आयएमएच्या ३४ संघटनांचा पाठिंबा लाभला होता. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाला असला तरी त्यामुळे निर्णयात कोणताही फरक पडणार नाही.

-----------------------

इन्फो

आयुष डॉक्टरांकडून स्वागत

बीएएमएसनंतर तीन वर्षांची एमएस ही पदव्युत्तर पदवी घेतलेल्या डॉक्टरांनाच शस्त्रक्रियेची अधिकृत परवानगी मिळाली असल्याचे भान विरोध करणाऱ्यांनी ठेवायला हवे. सरकारने या विषयात अधिक सुसूत्रता आणून कोणत्या शस्त्रक्रिया कराव्या, याची निश्चिती केली असल्याने गैरसमज होऊ नयेत.

डॉ. आशुतोष यार्दी, जिल्हा अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ

ॲलोपॅथी डॉक्टरांचा विरोध

या निर्णयामुळे विदेशांमध्ये ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिकच्या पदवीधारकांचे भिन्न महत्त्व उरणार नाही. आयुर्वेद करणाऱ्यांना पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदाचे उपचार आणि शास्त्र अनुसरून द्यावे तर मॉडर्न सायन्सला त्यांचे ॲलोपॅथीचे शास्त्र कायम ठेवू द्यावे. त्यात सरमिसळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा दोन्ही पॅथींमध्ये विपरीत परिणाम होईल.

डॉ. समीर चंद्रात्रे, अध्यक्ष, नाशिक आयएमए

-----------------

नवीन कायद्याचा फायदा

या निर्णयामुळे आयुर्वेदिक एमएस डॉक्टरांना निर्धारित ५८ शस्त्रक्रिया करता येणार आहेत. त्यामुळे अनेक एमएस डॉक्टर्स त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये या शस्त्रक्रिया करू शकतील. त्यामुळे तालुकास्तरावरही या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

नवीन कायद्याचा तोटा

आयुर्वेद ही स्वतंत्र प्रणाली असून, त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांना मॉडर्न सायन्सबाबत तितकेसे सखोल ज्ञान दिले जात नाही. त्यामुळे मान्यता दिलेल्या ५८ शस्त्रक्रियांसाठी त्यांच्याकडे पुरेसे प्रशिक्षण आणि अनुभवदेखील नसतो. त्यामुळे या शस्त्रक्रिया रुग्णांच्या जीवाशी खेळ ठरू शकतात, असा आयएमएचा दावा आहे.

----------------------------------

ज्या वैद्यकीय तज्ज्ञांनी बीएएमएस आणि त्यानंतर एमएस पूर्ण केले त्यांनाच शस्त्रक्रियेचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यांनी शस्त्रक्रियेचे ज्ञान हे सुश्रुत संहितेनुसार तसेच मॉडर्न सायन्सनुसारही शिकवले जाते. त्यामुळे आयुर्वेदाच्या एमएसना शस्त्रक्रियेचे ज्ञान, अनुभव नसल्याचा ॲलोपॅथी तज्ज्ञांचा दावा अयोग्य आहे.

वैद्य विक्रांत जाधव, आयुर्वेद तज्ज्ञ

-----------

आयुर्वेदाचा अभ्यासक्रम हा शंभर वर्षांहून अधिक काळापासून मिश्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे आयुर्वेदात एमएस होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शस्त्रक्रियादेखील शिकवल्या जातात. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असून, शस्त्रक्रियादेखील कमी खर्चिक होण्यास मदत होईल.

वैद्य एकनाथ कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञ

---------------

बीएएमएसनंतर एमएस करीत असताना त्यांना ॲलोपॅथीच्या व्हिजिटिंग फॅकल्टीकडून सर्जरीचे सखोल ज्ञान दिले जाते. तसेच संबंधित डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये किमान दीड वर्ष प्रत्यक्ष शस्त्रक्रियेचा सराव करावा लागतो. त्यानंतरच ते सर्जरी करीत असल्याने आयएमएचा आक्षेप अत्यंत अयोग्य आहे.

डॉ. श्रीपाद उपासनी, एम. एस., आयुर्वेद

Web Title: To the Ayurvedic field with the permission of surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.