बाजे रे मुरलीया बाजे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:50+5:302021-03-15T04:14:50+5:30

नाशिक : जणू तोच दैवी स्वर पुन्हा अवतरल्याचा भास अन् त्या स्वरांभोवती वळसे घालत आलेले मुरलीचे सूर रसिकजनांना एका ...

Baaje re Muralia baaje ...! | बाजे रे मुरलीया बाजे...!

बाजे रे मुरलीया बाजे...!

Next

नाशिक : जणू तोच दैवी स्वर पुन्हा अवतरल्याचा भास अन् त्या स्वरांभोवती वळसे घालत आलेले मुरलीचे सूर रसिकजनांना एका वेगळ्याच विश्वात नेणारे ठरले. प्रख्यात शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी आणि अमेरिकन बासरीवादक नॅश नाॅबर यांच्या अनोख्या जुगलबंदीने ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ज्या अभिजात सुरांनी सात दशके देश-विदेशात शास्त्रीय संगीताचा ठसा उमटवला, त्या पंडित भीमसेनजींना स्वर आणि सुरांच्या अनोख्या नजराण्याने मानवंदना देण्यात आली.

पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रित्विक फाउंडेशनच्या त्यांना सांगीतिक मानवंदनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य नॅश नॉबर यांनी यमन रागातील मत्ततालातील आलापी, तर द्रुततालात रागाचे प्रदर्शन घडवले. यमनमधील आलापी, ठहरावांच्या बहारदार सादरीकरणासह त्यांनी विविध प्रयोगदेखील केले. तसेच यमन रागातच तबल्यासमवेत अनोखी जुगलबंदी सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली, तर सादरीकरणाच्या अखेरच्या टप्प्यात प्रारंभी मोठ्या आणि नंतर लहान बासरीवर पहाडी धून सादर करताच रसिकांनी त्यांना मनमुराद दाद दिली. यावेळी बोलताना नॅश यांनी जन्मशताब्दी वर्षानिमित्त या रंगमंचावर सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य असल्याचे सांगितले. पंडितजी हे भारतीय शास्त्रीय संगीताला लाभलेले थोर रत्न होते. त्यांच्यासारखे महान कलाकार हे शतकांमधून एखादेच असतात अशा शब्दात पंडितजींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

प्रख्यात शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी पंडितजींच्या किराणा घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत असल्याचीच प्रचिती त्यांच्या स्वरांमधून दिली. मेवुंडी यांनी प्रारंभी पुरीया धनश्री रागामध्ये एकतालात ‘अरज सुनो नाम मेरी पार करो’ ही रचना तर द्रुततालात ‘पायलिया झनकार मोरी झनन झनन बाजे’ ही बंदीश अत्यंत बहारदारपणे सादर केली, तर केदार रागात एकतालातील ‘तुम रस कान्हा रे’ तर द्रुततालात ‘चदर सुखरा बालमवा’ ही बंदीश सादर करीत रसिकांकडून पसंतीची दाद मिळवली. त्यानंतर ‘सूर सुखमणी तु विमला’ हा पंडितजींचा अभंग, तर ‘ठुमक ठुमक पग कुंजमक चपल चरण हरी आये हो’ ही अनकही चित्रपटातील रचना त्यांनी बहारदारपणे सादर केली. या दोन्ही कलाकारांना तबल्यावर निखील फाटक आणि यशवंत वैष्णव, संवादीनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तानपुऱ्यावर ओमकार कडवे आणि पार्थ शर्मा पखवाजवर सुखद मुंढे तर तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे यांनी अप्रतिम साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रास्ताविक पंचम निषादच्या शशी व्यास यांनी उलगडून दाखवली. तसेच कलाकारांचा परिचय करून देत पंडित भीमसेनजींना अभिवादन करण्यासाठी देशातील सहा शहरांमध्ये हा कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले.

इन्फो

माझे माहेर पंढरी

खास भीमसेनजींचा अमीट ठसा असलेली ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी’ आणि ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ ही भक्तिगीते मेवुंडी यांनी अत्यंत तयारीने आणि तल्लीनतेने सादर करीत रसिकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. भक्तिरसाच्या या बहरानंतरच सादर झालेल्या ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या गीतावर मेवुंडी यांचे गायन आणि नॅश यांच्या मुरलीच्या सुरांनी तर रसिकांना परमोच्च आनंद मिळवून दिला.

फोटो

१४ पीएचएम ९९

पंडित भीमसेन जोशी यांना सांगीतिक मानवंदना देताना शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी आणि नॅश नॉबर. समवेत निखील फाटक, यशवंत वैष्णव, ज्ञानेश्वर सोनवणे, ओमकार कडवे, पार्थ शर्मा, सुखद मुंढे, सूर्यकांत सुर्वे आदी.

Web Title: Baaje re Muralia baaje ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.