बाबा शेख खूनप्रकरणी संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:01 AM2020-10-17T01:01:22+5:302020-10-17T01:01:46+5:30
सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्या खुनप्रकरणी फरारी असलेला मुख्य संशयित तौफिक उर्फ टिपू शेख याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.
नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्या खुनप्रकरणी फरारी असलेला मुख्य संशयित तौफिक उर्फ टिपू शेख याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.
सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार नवाज उर्फ बाबा बब्बू शेख याचा गेल्या २० सप्टेंबरला रात्री डीजीपीनगर येथील साई मंदिराजवळ गोळी झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित समीर खान उर्फ मुर्गी राजा व अर्जुन पीवाल यांना अटक केली होती. मात्र, खुनानंतर मुख्य संशयित तौफिक उर्फ टिप्पू मन्सूर शेख (रा. भीमनगर, जेलरोड) हा फरार होता.
गेल्या २५ दिवसांपासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना शेख श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेचे रघुनाथ शेगर, रवींद्र बागुल, विशाल काटे, दिलीप मोंढे, महेश साळुंके, देवरे यांनी गुरुवारी रात्री हरेगावला जाऊन घरात लपून बसलेल्या टिपू शेखला शिताफीने ताब्यात घेतले.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
नाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित करून नंतर दुसऱ्याच मुलीबरोबर विवाह केल्याप्रकरणी पंचवटीतील हिरावाडी येथील संशयित तरुणास पोलिसांना गुन्हा दाखल केला
आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार २०१७ ते २०२० या कालावधीस संशयित प्रदीप जाधव याने संबंधित महिलेला अनेकदा लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरीसंबध प्रस्थापित केले. शिवाय तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याचेही पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतरही नेहमीच लग्नाचे आमिष दाखविले, मात्र संशयिताने दुसऱ्या एका मुलीबरोबरच विवाह केल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद पीडितीने पंचवटी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती, जमाती अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरवाजा तोडून कपाटातील ऐवज लंपास
नाशिक : घराला कुलूप लावून कुटूंबिया बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद अशोक भानजी गोहिल (रा. गोविंद अपार्टमेंट, आरटीओ ऑफिसजवळ) यांनी पोलिसांत दाखल केली आहे. गेल्या ७ ते १४ तारखेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचा लोखंडी दरवाजा जोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, तसेच पंधरा हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.