बिबट्याची दहशत वासरू, कुत्र्याचा फडशा : पिंजरा लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 07:59 PM2020-03-10T19:59:48+5:302020-03-10T20:02:50+5:30
दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : वडनेर दुमाल्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असून, दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा फडशा पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाची वन खात्यानेही दखल घेवून तातडीने पिंजरा लावला असला तरी, बिबट्या हुलकावणी देण्यात यशस्वी झाला आहे.
वडनेर दुमाला हा परिसर लष्कराच्या हद्दीला लागून असून, शिवाय परिसरात शेतजमीन व जंगलही मोठ्या प्रमाणात आहे. गावाबरोबरच अनेक शेतकरी शेतातच घरे बांधून राहात आहेत. असे एकटे दुकटे घर, गोठे बिबट्याचे लक्ष्य ठरू लागले आहे. त्यातूनच दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या मळ्यातील गोठ्यात रात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून छोटे वासरू ओढून नेले. बिबट्याच्या शिरकावाची भणक पाटील यांच्या पाळीव कुत्र्याला लागली असता, बिबट्याने बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्यावरही हल्ला चढवून त्याला ठार मारले आहे. दुस-या दिवशी सकाळी ही घटना उडकीस येताच, पाटील यांच्या मळ्यात शेतकऱ्यांनी गर्दी केली. त्याच बरोबर त्यांच्या आजुबाजुच्या शेतक-यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या घटनेची खबर वन खात्यास देण्यात आली असता, त्यांनी पोपट दत्तु पाटोळे यांच्या शेतात पिंजरा लावला असून, त्यात कुत्रे बांधून ठेवण्यात आले आहे. मात्र बिबट्याने पिंज-याकडे पाठ फिरविली आहे. वडनेर दुमाला परिसरात अधून मधून बिबट्याचे खुले आम दर्शन होत असून, त्यामुळे शेतकरी दिवसाही एकटे दुकटे फिरण्यास घाबरत आहेत.