बाभूळगाव महिला जळीत प्रकरणी जबानीत तफावत
By admin | Published: October 19, 2014 12:11 AM2014-10-19T00:11:42+5:302014-10-19T16:53:16+5:30
बाभूळगाव महिला जळीत प्रकरणी जबानीत तफावत
येवला : अपेक्षित उमेदवाराला मतदान केले नाही म्हणून बाभूळगाव येथील एका महिलेला संगनमताने तिघांनी रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सदर महिलेच्या मुलीने आई डबा घ्यायला गेली आणि गॅसमुळे पदर पेटल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या घटने संदर्भात पोलीस तपासात वेगळीच परिस्थिती समोर येत आहे ही घटना आणि जबानी यात मोठी तफावत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
पोलिसांनी याप्रकरणी तिने संशयितांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने या तिघांना दि.२० आॅक्टोबरपर्य$ंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या घटनेत महिला ६५ टक्के भाजली असून, ती गंभीर आहे. बाभूळगाव येथील विठ्ठल-
रुखमाई मंदिरासमोर राहणारी झेलूबाई जगन्नाथ वाबळे ही महिला जळाल्यानंतर आरडाओरड करीत असताना कमलाबाई लोंढे या गवत कापणाऱ्या गावातील महिलेने तिला बघितले होते. सदरची घटना स्टोव्हमुळे झाली नसून गॅसवर साडीचा पदर पेटल्यामुळे झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेत आरोप ठेवलेले तिघे जण बाभूळगावात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. गुण्यागोविंदाने बाभूळगावी राहणारे हे लोक असे कृत्य करू शकत नाही असे त्यांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटना घडली तेव्हा गावात लाईटदेखील नव्हते. यामुळे या तिघांचे चेहरे सदर महिलेला कसे दिसले. असे अनेक प्रश्न हा तपासाचा भाग आहेत. ते अद्याप अनुत्तरीत आहेत. डी.एन.ए.चे नमुनेदेखील तपासासाठी घेतले आहे. घटनेच्या मुळाशी जाऊन तपास चालू आहे. सदर महिलेच्या मुलीची जबानीदेखील सदर महिलेच्या म्हणण्याला छेद देणारी आहे. या घटनेतील आरोपी अशोक बोरनारे हा भाजलेल्या महिलेला वाचविण्यासाठी गेला होता. अशी सर्व माहिती पोलीस अधीक्षक मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली. पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी हेही यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी येवला शहर पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, सहायक पोलीस निरीक्षक किरण राठोड हे तपास करीत आहेत. परिस्थिती जन्य पुरावा आणि जबानी यात मोठी तफावत असल्याचे मोहिते म्हणाले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी येवल्यात भेट देऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत. (वार्ताहर)