'बाबरी' स्मृतिदिन : केवळ मशिदींमध्ये ‘अजान’ पठणाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:28 PM2018-12-05T14:28:39+5:302018-12-05T14:36:14+5:30
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असे पत्रकात म्हटले आहे.
नाशिक : बाबरी मशिदीच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी (दि.६) जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असे पत्रकात म्हटले आहे.
अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी सर्व मशिदींमधून धर्मगुरूंकडून करण्यात आले. तसेच संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचे खतीब म्हणाले. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा बडी दर्गाच्या प्रारंगणात होणार आहे. यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याची माहिती नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी दिली. जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. स्वतंत्रपणे आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये, अशी सूचना सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले आहे. या बैठकीत केवळ मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.