बाळाने खेळताना गिळले नेलकटर, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:58 PM2022-09-21T14:58:08+5:302022-09-21T14:58:33+5:30
नाशिकमधील घटना : सुदैवाने वाचले प्राण, शस्त्रक्रिया यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील नाशिकरोड भागातील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाने घरात खेळताना हाती लागलेले नेलकटर चक्क गिळले. बाळाला त्रास होऊ लागल्याची बाब वेळीच आईच्या लक्षात आल्याने तातडीने बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथे तपासणी केल्यानंतर तेथून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी यशस्वीपणे नेलकटर बाहेर काढले.
बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी मंगळवारी सांगितले. कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीमुळे बाळाचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिक रोडचे हे कुटुंब बाळाला घेऊन सर्वप्रथम आले होते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्गाने तपासणी केली असता शस्त्रक्रिया अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथून मुलाला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय कुटुंबातील प्रमुखांनी घेतला. तेथे रात्री यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाळाच्या घशात अडकलेले नेलकटर काढण्यात डॉक्टरांना यश आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी अशा गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.