बिबट्याचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 09:55 PM2020-01-24T21:55:30+5:302020-01-25T00:37:43+5:30
गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे दररोज दर्शन होत असल्याने शेतकरी व मजूरवर्ग शेतात जाण्यासाठी धजावत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील कालव्यालगत पिंजरा लावला आहे.
नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे दररोज दर्शन होत असल्याने शेतकरी व मजूरवर्ग शेतात जाण्यासाठी धजावत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील कालव्यालगत पिंजरा लावला आहे.
नांदूरशिंगोटे परिसरातील दोडी, मानोरी, कणकोरी आदी भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावर भोजापूर कालव्यालगत मोठ्या प्रमाणात वनविभागाचे पडीक जंगल आहे. तसेच चास खिंडीजवळ शेतजमिनी आहेत. चार दिवसांपूर्वी भोजापूर कालव्यालगत रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यानंतर गुरु वारी रात्री शेळके या व्यक्तीलाही शेतातील पिकांना पाणी देताना बिबट्याचे दर्शन घडले. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. वनपाल प्रितेश सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर यांच्यासह कर्मचाºयांनी शुक्र वारी परिसराची पाहणी करून दुपारनंतर कालव्यालगत पिंजरा लावला.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बोगदेवाडी (ठाकरवाडी) भागात गुरु वारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महादू सावळीराम आगिवले यांच्या मेंढीवर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली. आगिवले यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे.