बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:41 AM2017-07-26T00:41:48+5:302017-07-26T00:42:01+5:30
नाशिक :अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. महापालिका आयुक्तांचे समर्थन करतानाच बच्चू कडू यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सोमवारी (दि.२४) आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेतली असता, त्यावेळी कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर बच्चू कडू यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. आयुक्तांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२५) महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र जमत प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘बच्चू कडू हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या. बच्चू कडू यांच्यावर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे, भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी यावेळी भाषणे करत या साऱ्या प्रकरणात आयुक्तांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शिवाय, बच्चू कडू यांची कृती निषेधार्ह असल्याचे सांगत कारवाईची मागणी करण्यात आली.
लेखणी बंद आंदोलन मागे
म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने काळ्या फिती लावण्याबरोबरच लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. परंतु, महापौर रंजना भानसी आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बच्चू कडू यांच्याविरुद्ध आता कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी लेखणी बंद आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार कर्मचारी सेनेने आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
क्रेडाईसह विविध संस्थांचाही सहभाग
कर्मचारी व अधिकारी यांनी पुकारलेल्या आंदोलनात शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईसह वास्तुविशारद आणि अभियंता यांच्या संघटनांचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरामय जॉगिंग ट्रॅकचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी बच्चू कडू यांच्या कृतीचा निषेध करत आयुक्तांनाही निवेदन दिले.