पदवीधरला परिवर्तनाची मुहूर्तमेढ
By admin | Published: January 18, 2017 12:44 AM2017-01-18T00:44:40+5:302017-01-18T00:45:33+5:30
राधाकृष्ण विखे-पाटील : कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर
नाशिक : नोटाबंदीनंतर तब्बल ६३ विविध प्रकारचे निर्णय केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेला काढावे लागले, यातच नोटाबंदीचे अपयश आहे. आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने कॉँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होऊन परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. पाटीदार भवन येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, माजी खासदार प्रताप वाघ, माजी आमदार जयंत ससाणे, अनिलकुमार अहेर, नानासाहेब बोरस्ते, एन. एम. आव्हाड, निवृत्ती डावरे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, श्याम सनेर, डॉ. सूचेता बच्छाव, तुषार शेवाळे, डीटीएफचे फिरोज बादशाह, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, कविता कर्डक, लक्ष्मण जायभावे, यशवंत पाटील, बंडू भाबड, हर्षल तांबे आदि उपस्थित होते. विखे-पाटील पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्राचा विस्तार खूप मोेठा आहे. या क्षेत्रात काम करणे किती अवघड असते, याचा अनुभव आपण शिक्षणमंत्री असताना घेतला आहे. विद्यमान सरकारने शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असून, शिक्षण क्षेत्राच्या या खेळखंडोबाबत आवाज उठविणे गरजेचे आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, भाजपाच्या मेळाव्यात म्हणे नगरसेवकांना ४००, तर आमदारांना एक हजार कार्यकर्ते आणण्याचा कोटा दिला होता. मात्र, आघाडीला असे करण्याची गरज भासत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, फिरोज बादशहा यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)