पदवीधरची प्रचारधुमाळी शांत
By admin | Published: February 2, 2017 01:55 AM2017-02-02T01:55:56+5:302017-02-02T01:56:12+5:30
शुक्रवारी मतदान : आज साहित्याचे वाटप
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रचाराची रणधुमाळी बुधवारी सायंकाळी संपुष्टात आली. शुक्रवारी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण होऊन गुरुवारी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
रिंगणात कॉँग्रेस आघाडीकडून डॉ. सुधीर तांबे, भाजपाकडून डॉ. प्रशांत पाटील, डाव्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांच्यासह चौदा अपक्ष उमेदवार रिंगणात असून, गेल्या महिनाभरापासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. भाजपाकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या तर कॉँग्रेस आघाडीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आदिंनी हजेरी लावली होती. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात या निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत भरली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानाची वेळ संपल्याच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचाराची मुदत संपत असल्याने बुधवारी चार वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)