‘बेचकीत जन्मतो जीव’ मानवकेंद्री धाडसी काव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:17 AM2018-07-01T01:17:17+5:302018-07-01T01:17:34+5:30
‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहातील रचना या समाजातील वास्तविकतेचे धाडसी चित्रण करणाऱ्या असून, सामाजिक भान ठेवून प्रसंगी विद्रोही शब्दांनीही समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणाºया किशोर पाठक यांनी आपल्या कवितांमधून माणसांचा शोध घेतला असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
नाशिक : ‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहातील रचना या समाजातील वास्तविकतेचे धाडसी चित्रण करणाऱ्या असून, सामाजिक भान ठेवून प्रसंगी विद्रोही शब्दांनीही समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणाºया किशोर पाठक यांनी आपल्या कवितांमधून माणसांचा शोध घेतला असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.३०) किशोर पाठक यांच्या ‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व प्रा. गंगाधर अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांंच्यावर कुटुंबात झालेल्या सामाजिक एकतेच्या संस्काराचा ऊहापोह विचारवंतांनी केला. प्रा. कसबे म्हणाले की, माणसाला आपला जन्म आणि मृत्यू त्याच्या हाती नसतो. मात्र जन्म झाल्यानंतर परिस्थितीशी लढत माणुसकी जपण्यासाठी सर्जनशीलता जपण्याचे धाडस पाठक यांच्या कवितेत सापडते. कवि कुसुमाग्रज यांनी जो सामाजिक वारसा कवितांतून मांडला, तो वारसा पाठक चालवित आहेत. ही सामाजिक भूमिका पाठक यांच्या कवितेत स्पष्टपणे जावणत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले, तर उत्तम कांबळे म्हणाले, पाठक यांच्या विद्रोही कवितांमधून हे धाडस दिसून येते. त्यांच्या कविता भुतकाळात रमणाºया नाहीत. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.
कवितांचे नाट्य सादरीकरण
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी किशोर पाठक यांच्या कवितांचे नाट्य सादरीकरण करण्यात आले. या कलाकृतीचे दिग्दर्शन सचिन शिंदे आणि राहुल गायकवाड यांनी केले असून नाट्य कलाविष्कारातून समाज, जात,धर्म,चळवळी आणि समाजातील नीती-अनितींवर भाष्य करणाºया कवितांच्या नाट्य सादरीकरणातून दामिनी जाधव, आशिष दळवी, प्रथमेश देशपांडे, प्रताप कमोद, साक्षी ढगे,एकता आढाव आदीं कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.