मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय मागे
By admin | Published: March 20, 2017 10:39 PM2017-03-20T22:39:36+5:302017-03-20T22:39:36+5:30
सोमवारी (दि.२०) संघटनेच्या झालेल्या बैठकीत या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय जनहितार्थ मागे घेण्यात आल्याचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्चअखेर तपासणी मोहिमेच्या नावाखाली गोळे कॉलनीमधील औषध विक्रेत्यांकडून खंडणी वसूल केल्याची तक्रार गेल्या बुधवारी (दि.१५) काही विक्रेत्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सदर प्रकार व्यावसायिक संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर नाशिक जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने अन्न- औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सोमवारी (दि.२०) संघटनेच्या झालेल्या बैठकीत या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय जनहितार्थ मागे घेण्यात आल्याचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी गोळे कॉलनीमधील काही दुकानांना भेटी देत तपासणी केली. यावेळी औषध साठा विनापरवाना केल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी सदर साठा जप्त करण्याची धमकी देत औषध साठ्याच्या एकूण किमतीच्या वीस टक्के रक्कम देण्याची मागणी केल्याचा आरोप मधुसुदन कलंत्री, सचिन पटणी यांनी सरकारवाडा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान, तीन लाख रुपयांची खंडणी संबंधित सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांनी वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्यामुळे संघटनेच्या वतीने शिष्टमंडळ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.