खराब रस्त्यांमुळे पाठदुखी
By admin | Published: August 21, 2016 11:12 PM2016-08-21T23:12:29+5:302016-08-21T23:23:39+5:30
इगतपुरी : तालुक्यातील वाहनचालकांना दररोज करावी लागते कसरत
बेलगाव कुऱ्हे : रस्ते म्हणजे विकासाची नांदी समजले जातात; मात्र इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिवृष्टीने अनेक रस्ते खराब झाली आहेत. घोटी-सिन्नर महामार्गावरील शेणीत येथे रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. रस्ते दुरुस्तीसाठी अन्य तालुक्यात वारेमाप खर्च होत असताना येथे मात्र खड्डे बुजविण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. पर्यायाने आधीच त्रस्त झालेले वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करून दुरु स्ती करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख मनोज सहाणे यांनी दिला आहे. दयनीय स्थितीतील रस्त्यांमुळे वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहे
वाहने चालविण्याचा खड्ड्यांचा अंदाज चुकल्याने अपघात होत आहेत. अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, साकूर, जानोरी आदि गावांतील वाहनधारकांना अपरात्री कामावरून या रस्त्याने प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा या रस्त्यावर छोटे मोठे अपघातदेखील घडले आहेत. दरम्यान, तालुक्यातील आदिवासी भागातील वडाचीवाडी ते नांदगाव बुद्रुक रस्त्यावरील बांडेवाडीजवळ एक छोटीसी सहासे ते सातशे माणसांची वस्ती असून, येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निवडणुका झाल्यापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. आदिवासी व गोरगरिब ग्रामस्थया गैरसोयीमुळे मेटाकुटीस आले आहेत. आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे नागरिकांचे संतप्त सूर एकवटून आला आहे. आदिवासी जनतेशी संवाद साधला असता त्यांना हेही माहित नाही की, हा रस्ता कोणाच्या हद्दीतील आहे. तालुक्याची खरी ओळख आदिवासी म्हणून पटविणाऱ्या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
(वार्ताहर)