पित्याच्या शवाकडे वंशाच्या दिव्यानेही फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:53+5:302021-04-14T04:13:53+5:30
शफीक शेख मालेगाव : मुलांनी रस्त्यावर टाकून दिलेल्या वृद्धाचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अडीच महिने सांभाळ करीत त्यांच्यावर उपचारही केले. ...
शफीक शेख
मालेगाव : मुलांनी रस्त्यावर टाकून दिलेल्या वृद्धाचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अडीच महिने सांभाळ करीत त्यांच्यावर उपचारही केले. मात्र दुर्दैवाने त्या वृद्धाने जगाचा निरोप घेतला तेव्हा अंत्यविधीसाठी वंशाचा दिवा धावून आला नाही. अखेर लेकीचा शोध घेऊन पार्थिव तिच्या हवाली करून दफनविधी पार पडला. तोपर्यंत नात्यातील ओलावा आटल्याची प्रचिती देणाऱ्या या घटनेने अनेकांना सुन्न केले होते.
अडीच महिन्यांपूर्वी सय्यद इस्माईल हा वृद्ध अत्यवस्थ स्थितीत सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख यांना बडा कब्रस्तानजवळ आढळून आला होता. त्यांनी इस्माईल यांना रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात आणले. त्यांच्या मुलाशी संपर्क साधला, परंतु कुणीही प्रतिसाद दिला नव्हता. मुलीनेही सासरी त्रास होईल म्हणून पित्याला आपल्या घरी नेले नव्हते. अखेर हताश होऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी सामान्य रुग्णालयात आणून सदर वृद्धावर अडीच महिने उपचार केले. त्यात त्यांना बरे वाटू लागले होते. सय्यद इस्माईल उठून बसले होते, मात्र अडीच महिन्यांच्या आजारपणात त्यांचा मुलगा अथवा नातेवाईक कुणीच सामान्य रुग्णालयाकडे फिरकले नाही किंवा साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनीच वृद्धाच्या भोजनाची व्यवस्था केली. अडीच महिन्यांच्या सेवेनंतर त्या वृद्धाने अखेर जगाचा निरोप घेतला. अखेरच्या विधीसाठी कुटुंबीयांशी संपर्क साधला. नाशकात नोकरी करणाऱ्या मुलाशी तसेच नातवंडांशी संपर्क साधूनही मृतदेह घेण्यास कुणीच पुढे आले नाही. त्यानंतर वृद्धाच्या विवाहित मुलीचा शोध घेऊन मृतदेह तिच्या आणि जावयाच्या ताब्यात दिला. दुपारी आयेशानगर कब्रस्तानात सामाजिक कार्यकर्त्यांनी दफन विधी केला. मात्र वारस असूनही एका पित्याचा अखेरचा प्रवास इतका लाजिरवाणा व्हावा, हेच अनेकांना खटकत राहिले.