स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील मानोरीत आरोग्य पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:50 PM2017-11-09T23:50:59+5:302017-11-10T00:02:45+5:30
सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारासाठी तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारासाठी तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून मानोरी येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील सांगळे वस्तीवर पांडुरंग सांगळे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी कमळाबाई पांडुरंग सांगळे (५०) यांना गेल्या आठवड्यात सर्दी, खोकला, ताप येत असल्याने त्यांना संगमनेर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तेथे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. त्यांच्या विविध तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लूची आजाराची लक्षणे दिसून आल्याचे समजले. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. बुधवारी (दि. ८) सांगळे यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी उशिरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णांनी तपासणी करून घेतली. त्यांना टॉमी फ्लूची औषधे सुरू करण्यात आली आहेत.