‘बडे बाबा’चा आलिशान ‘आश्रम’ अन‌् मोठ्या करामती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:38 AM2020-12-21T00:38:47+5:302020-12-21T00:39:06+5:30

भोळ्याभाबड्या भक्तांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत बनावट सोन्याच्या विटा दाखवून हजारो ते लाखो रुपयांची रोकड लाटणाऱ्या ‘बडे बाबा ऊर्फ पाथर्डीवाला’ अर्थातच संशयित गणेश जयराम जगताप (३७) याने वडाळा-पाथर्डी रस्त्यावर ‘श्रद्धा व्हिला’मध्ये आलिशान आश्रम थाटला आहे. या भोंदूबाबाने नाशिकसह औरंगाबाद, लातूरमधील काही नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत असून, या बाबाला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.

Bade Baba's luxurious 'Ashram' and big tricks | ‘बडे बाबा’चा आलिशान ‘आश्रम’ अन‌् मोठ्या करामती

‘बडे बाबा’चा आलिशान ‘आश्रम’ अन‌् मोठ्या करामती

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यभरात ‘नेटवर्क’ : जादूटोणाविरोधी गुन्हा नोंदविण्याची ‘अंनिस’ची मागणी; कोट्यवधींची जमविली ‘माया’

नाशिक : भोळ्याभाबड्या भक्तांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत बनावट सोन्याच्या विटा दाखवून हजारो ते लाखो रुपयांची रोकड लाटणाऱ्या ‘बडे बाबा ऊर्फ पाथर्डीवाला’ अर्थातच संशयित गणेश जयराम जगताप (३७) याने वडाळा-पाथर्डी रस्त्यावर ‘श्रद्धा व्हिला’मध्ये आलिशान आश्रम थाटला आहे. या भोंदूबाबाने नाशिकसह औरंगाबाद, लातूरमधील काही नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत असून, या बाबाला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.

धगधगत्या निखाऱ्यांवरून चालणे, सप्ताह भरविणे, देव-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांतून या बडे बाबाने लोकांचा विश्वास संपादन केला. ‘माझ्या ताब्यात दैवीशक्ती आहे. मी तुम्हाला जमिनीतून सोने काढून देतो आणि पैशांचा पाऊस पाडतो...माझी बड्या राजकीय लोकांसोबत गट्टी आहे, तुमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या लावून देतो...’ असे सांगून या बडे बाबाने अहमदनगर, नांदेड, सोलापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अमरावती अशा विविध शहरांमधील विविध लोकांसह काही मोठ्या उद्योजकांनाही आपल्या गळाला लावले आहे.. या बाबाने राज्यातील विविध जिल्ह्यांत ‘नेटवर्क’ तयार केले असून, पोलिसांपुढे त्याची सर्व पाळेमुळे उखडून फेकण्याचे आव्हान निर्माण झाले आहे..

बाबाने वडाळागाव, इंदिरानगर, पाथर्डी आदी भागातील गुंडांनांही हाताशी धरून अघोरी कृत्य करत अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. हा आश्रम आणि बाबाचे ‘नेटवर्क’ बघून पोलीससुध्दा चक्रावून गेले आहेत. त्याने स्वत:च्या नावापुढे श्री श्री १००८ महंत गणेशानंदगिरीजी महाराज असे लिहून अनेकांना गंडा घातला आहे. त्याने बडे बाबा मच्छिंद्रनाथ नावाने ट्रस्टही स्थापन केली आहे. संशयित गणेश जगतापविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी निवेदनाद्वरे केली आहे.

--इन्फो--

मॅनेजरपासून बनला ‘बडे बाबा’

 

नाशिकमधील एका मोठ्या मंडप व्यावसायिकाकडे पूर्वी व्यवस्थापक म्हणून तो नोकरीला होता. कालांतराने त्याने आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून २०१२पासून आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये आपले जाळे पसरविले. लोकांना बनावट सोने दाखवून फसवणूक केली, तर आश्रमासह विविध समाजोपयोगी वास्तूंच्या निर्माणासाठी रोख रकमेची गरज आहे’ असे सांगून धनादेशांसह रोख स्वरूपात पैसा स्वीकारण्यास सुरुवात केली आण कोट्यवधींची माया जमवली. त्याचे विविध बँकांमध्ये खाती असून, काही खाती त्याने त्याच्या विश्वासू कथित महिला सेवकऱ्यांच्या नावाने उघडली असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

----इन्फो---

आशेवाडीत चाले पूजाविधी अन‌् चमत्कार

दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी गावातील एका मळ्यामध्ये हा भोंदूबाबा भक्तांना चमत्कार दाखवून पूजाविधीचा ‘थाट-पाट’ मांडत होता. यासाठी नाशिक जिल्ह्यातून त्याच्याकडे भक्त रात्री या ठिकाणी जमत होते. चमत्कार दाखविताना स्वत:जवळील एका रानऔषधी वनस्पतीचा वापर करत त्याचे मंजन स्वत:च्या दातावर लावत असे. त्याच्या उग्रवासामुळे समोरची व्यक्ती जवळपास स्वत:चे भान हरवून बसते आणि बाबा जे बोलेल त्यास ती व्यक्ती होकार देते, याचाच फायदा घेत या बाबाने अनेकांना गंडा घातला, असे तपासात पुढे आले आहे.

 

---कोट---

सोलापूर व लातूर जिल्ह्यातील नातेवाइकांना या बाबाने रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून सुमारे आठ लाेकांना एकूण १९ लाख रुपयांना गंडा घातला होता. सोलापूर येथील विजयकुमार डिगे यांच्याकडून ७६ लाख रुपये उकळले. त्यांचा शेती आणि बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांना बनावट सोन्याची बिस्किटे आणि पितळी, लोखंडी गज सोन्याचे असल्याचे भासविले होते. या बाबाने या कृत्यात माझ्या काही नातेवाइकांसह मित्रपरिवाराचाही समावेश आहे, असे सांगितले. याच्याविरुद्ध इंदिरानगर, सातपूर पोलिसांकडे मी तक्रारदेखील केली आहे. पोलिसांना याचे अघोरी प्रकाराबाबतचे सर्व पुरावे दिले आहेत.

- श्रीमंत बागल, लातूर

---

 

Web Title: Bade Baba's luxurious 'Ashram' and big tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.