बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत
By admin | Published: June 29, 2015 01:09 AM2015-06-29T01:09:42+5:302015-06-29T01:09:42+5:30
बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत
नाशिक : पावसामुळे पहाडी भागात आलेल्या पुराचा फटका बसून बंद झालेल्या बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत असून, ते परतीच्या मार्गावर असल्याची माहिती विविध टुर कंपन्यांनी दिली. बद्रीनाथ परिसरातील पाऊस आता लांबला असला तरी वाहून आलेला मलबा आणि गावांचा तुटलेला संपर्क यामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हा अडथळा दूर झाल्यावर यात्रा पूर्ववत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपूर्वी केदारनाथ परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या भागात यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या घटली होती. दोन वर्षांनंतर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच पुन्हा जोरदार पाऊस आल्याने पहाडी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बुधवारपासून येथे अनेक यात्रेकरू अडकून पडले होते. त्यांना सोडविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू होते. त्यादरम्यान येथील यात्राही स्थगित करण्यात आली होती.नाशिकमधून सुमारे दहा हजार भाविक चारधाम यात्रेला गेल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे ते सगळे सुखरूप आहेत. त्यांच्यातील बहुसंख्य भाविक परतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. काही भाविक रेल्वेने, तर काही यात्रा कंपनीच्या माध्यमातून तिकडे रवाना झाले आहेत. पाऊस येऊन गेल्यानंतरही गंगोत्री यमुनोत्री यात्रा सुरळीत आहे. बद्रीनाथ-केदारनाथचे दर्शन दोन दिवसांपासून बंद असून, ते लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते आहे. नाशिकच्या काही भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन न घेताच परतण्यास प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून डोंगराळ भागात होणारा पाऊस थांबला असून, पहाडांमधून वाहून आलेला मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय पुरामुळे तुटलेले पूल बांधण्याचे कामही सुरू असल्याने बुधवारपासून यात्रा सुरळीत होईल, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जात असल्याचे भाविकांनी सांगितले. (प्रतिनिधी)