१५ समाजकंटकांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:12 AM2020-04-09T00:12:33+5:302020-04-09T00:13:53+5:30
सोशल मीडियाच्या गैरवापरावर ग्रामीण पोलिसांचीदेखील करडी नजर आहे. या माध्यमांतून समाजविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंधरा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह जिल्ह्याच्या भागात संचारबंदीसह साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या गैरवापरावर ग्रामीण पोलिसांचीदेखील करडी नजर आहे. या माध्यमांतून समाजविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंधरा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ग्रामीण भागात गाव, तालुक्यांच्या ठिकाणी एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र, राज्य शासनातर्फे संपूर्ण भारतात लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात संचारबंदी आदेश लागू आहेत. सदर कालावधीमध्ये केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू, सेवांचा पुरवठा सुरू आहे. या काळात काही समाजविघातक व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफितीद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा अफवा पसरवत असल्याचे अधीक्षक डॉ. आरती सिंंह यांच्या लक्षात आले. कोणतीही खातरजमा न करता चुकीची माहितीवजा बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी सर्वच तालुक्यांना अलर्ट दिला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियाद्वारे एसएमएस, व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर व्ट्टिर, टिकटॉक, हॅलो, इन्स्टाग्रामचा केवळ मनोरंजन आणि समाजप्रबोधनासाठी सुयोग्य वापर करावा. दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफीत आदी कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाद्वारे प्रसारित केल्यास कारवाईसाठी ते पात्र राहतील, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.