साडेपाच तोळे सोने असलेली बॅग प्रवाशाला केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:41 AM2019-03-28T00:41:43+5:302019-03-28T00:42:20+5:30
दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एक कुटुंब सिडकोला येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी एका रिक्षातून प्रवास केला असता सोबत असलेली बॅग ते कुटुंब अनावधानाने रिक्षामध्ये विसरले;
सिडको : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एक कुटुंब सिडकोला येण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी एका रिक्षातून प्रवास केला असता सोबत असलेली बॅग ते कुटुंब अनावधानाने रिक्षामध्ये विसरले; मात्र ही बाब रिक्षाचालकाच्या उशिरा लक्षात आल्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाणे गाठून त्यांच्याकडे बॅग स्वाधीन केली. या बॅगेत महत्त्वाच्या कागदपत्रांसह सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने होते.
दरम्यान, पोलिसांनी या रिक्षा चालकाचा सत्कार केला़ प्रकाश मुरलीधर सोनार (रा. वणी) हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला बुधवारी (दि.२७) आले. सोनार कुटुंबीय पवननगरपर्यंत रिक्षामधून (एमएच १५, एफ यू ०३३७)आले. रिक्षातून प्रवासी उतरून गेल्यानंतर रिक्षाचालक वाल्मीक गायकवाड यांच्या लक्षात आले की, प्रवासी त्यांची बॅग रिक्षातच विसरून निघाले आहे. गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षा थेट अंबड पोलीस ठाण्यात धाडली. त्यानंतर पोलिसांनी या बॅगेची तपासणी करीत त्यामध्ये असलेल्या कागदपत्रांवरून सोनार यांचा शोध घेऊन संपर्क साधला व त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी रिक्षाचालक गायकवाड यांच्या हस्ते ही बॅग सोनार यांच्या ताब्यात देण्यात आली. रिक्षाचालक गायकवाड यांनी दाखविलेले प्रसंगावधान व प्रामाणिकपणामुळे ‘प्रवासी देवो भव:’ म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याची चर्चा सिडको परिसरातून होत होती.