बागलाणला भाजपाची सरशी
By admin | Published: February 24, 2017 12:51 AM2017-02-24T00:51:27+5:302017-02-24T00:51:38+5:30
धक्कादायक निकाल : प्रथमच मिळाला मोठा विजय
सटाणा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बागलाण तालुक्यात अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पूर्णपणे सफाया झाला. तर कॉँग्रेस, राष्ट्रवादीलाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चार जागांवर विजय मिळविला, तर राष्ट्रवादी व कॉँग्रेसने प्रत्येकी फक्त एका जागेवर विजय मिळवत अनुक्र मे जायखेडा व ताहाराबाद हे गट राखण्यात यशस्वी झाले.
पठावेदिगर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा धुव्वा उडवत आदिवासी आघाडीचे उमेदवार व माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांनी विजय मिळविला. पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सात जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, अपक्षांनी प्रत्येकी दोन जागा मिळविल्या, तर सेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अखेरच्या चरणात बागलाणमध्ये सर्वच गट, गणात चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे काही गटांमधील निकाल धक्कादायक लागणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे आजचे बहुतांश निकाल हे उमेदवारांसह समर्थकांच्या काळजाचे ठोके चुकविणारेच होते. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी सव्वा अकरा वाजता पठावेदिगर गटाचा निकाल जाहीर करण्यात आला, तर शेवटचा निकाल सायंकाळी सव्वापाच वाजता जाहीर करण्यात आला. तब्बल आठ तास मतमोजणी प्रक्रि या सुरू होती. धिम्यागतीने सुरू असलेल्या या प्रक्रि येमुळे अन्य ठिकाणचे निकाल बारा वाजेच्या दरम्यान जाहीर झाले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष बागलाणकडे लागून होते. पठावेदिगर गटात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आदिवासी आघाडीचे उमेदवार गणेश लहानू अहिरे तीन हजाराच्या आघाडीवर होते. ही आघाडी अखेर पर्यंत कायम राहिल्याने ते विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सिंधूताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे यांचा पराभव केला. भाजपाचे मन्साराम वेडू गावित, बहुजन समाज पार्टीचे शिवदास महादू सोनवणे यांचे मात्र डिपॉझिट जप्त झाले. ताहाराबाद गटात कॉँग्रेसने आपला गड राखला. नणंद भावजयीच्या मारामारीत कॉँग्रेसच्या रेखा यशवंत पवार यांनी विजय मिळविला. नामपूर गटात भाजपाने हॅट्ट्रिक केली. कन्हू जंगलू गायकवाड यांनी बाजी मारली. वीरगाव गटात भाजपाने दहा वर्षांपूर्वी गेलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यात यश मिळविले.पंचायत समितीमध्ये त्रिशंकू बागलाण पंचायत समतिीत भाजपाने चौदापैकी सात जागांवर विजय मिळविला आहे. तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष यांना प्रत्येकी दोन तर सेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे; पठावेदिगर गणात आदिवासी आघाडीच्या केदूबाई राजू सोनवणे यांनी विजय मिळविला. मानूर गणात आदिवासी आघाडीने बाजी मारली. पंडित चैत्राम अहिरे विजयी झाले. ताहाराबाद गणात कॉँग्रेसने सत्ता काबीज केली. संजय यशवंत जोपळे यांचा विजय झाला. अंतापूर गणात कॉँग्रेसने बाजी मारली. रामदास पवळू सूर्यवंशी यांनी विजय मिळवला.जायखेडा गणात राष्ट्रवादीच्या वैशाली प्रशांत महाजन यांनी विजय मिळविला. आसखेडा गणात राष्ट्रवादीचे वसंत कडू पवार यांनी ५,४८० मते मिळवून बाजी मारली. त्यांनी भाजपाचे भारत शिवाजी पवार यांना पराभवाची धूळ चारली. त्यांना २,४४६ मते मिळाली. कॉँग्रेसचे दिनेश पंडित कापडणीस यांना १,८९५, सेनेचे प्रवीण कौतिक अहिरे ४२१, तर अपक्ष गणेश कौतिक सूर्यवंशी यांना १,२१९ मते मिळाली.नामपूर गणात भाजपाने सत्ता राखली. कल्पना अण्णासाहेब सावंत यांनी मिळवून विजय मिळविला. अंबासन गणात भाजपाने सत्ता मिळविली. शीतल जिभाऊ कोर या विजयी झाल्या. वीरगाव गणात भाजपाने सत्ता मिळविली. विमलबाई मंगू सोनवणे विजयी झाले. कंधाणे गणातही भाजपाने सत्ता मिळविली. मीनाबाई बापू सोनवणे विजयी झाल्या. ठेंगोडा गणात भाजपाने विजय मिळविला. ज्योती दिलीप अहिरे यांनी विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या सायली सोनवणे यांना २,७३३, अपक्ष शीतल पवार यांना ३,१३७, तर कॉँग्रेसच्या कमल अहिरे यांना १,४६१ मतांवर समाधान मानावे लागले. मुंजवाड गणात भाजपाचे अशोक उखाजी अहिरे यांना ३,५४० मते मिळाल्याने ते विजयी झाले. राष्ट्रवादीचे चेतन वनीस यांना २,८३७ कॉँग्रेसचे प्रतीक खरे यांना १८५२, अपक्ष राजेंद्र बच्छाव यांना १२१७ तर अपक्ष नरेंद्र खरे यांना ३०६ मतांवर समाधान मानावे लागले. ब्राह्मणगाव गणात भाजपाचे अतुल नरेंद्र अहिरे यांनी ५०६७ मते मिळवून विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे बाळासाहेब रामदास अहिरे यांना ४६४६, अपक्ष धर्मा पारखे यांना १६५ मतांवर समाधान मानावे लागले. लखमापूर गणात सेनेने सत्ता राखली. कान्हू भिका गायकवाड हे ५१९३ मते मिळवून विजयी झाले. भाजपाचे भारत सर्जेराव देवरे यांना ४५३९ तर भाजपा बंडखोर गजेंद्र चव्हाण यांना २९६२ मते मिळाली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी पोलीस कवायत मैदानावर गुलाल उधळून एकाच जल्लोष केला.