बागलाण परिसरात पावसाअभावी पेरण्या लांबल्या
By admin | Published: June 16, 2016 11:58 PM2016-06-16T23:58:06+5:302016-06-17T00:16:09+5:30
बागलाण परिसरात पावसाअभावी पेरण्या लांबल्या
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात जोरदार पाऊस न झाल्यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली असून, शेतकरी चातकासारखे आभाळाकडे डोळे बघत आहेत.
पावसाळा सुरू होऊनमहिना होत आला तरी पावसाला सुरुवात झाली नसून, खरीप पिकाच्या शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. जमिनीची नांगरणी, वखरणी, जमिनीत शेणखत मिळवणे आदि कामे पूर्ण झाली आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. परंतु सुरुवातीचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले तेव्हा शेतकऱ्याला मृग नक्षत्रात पाऊस पडेल, अशी आशा होती. मृग नक्षत्राच्या पावसाने खामखेडा परिसरातील सावकी, भऊर,
पिळकोस, बगडू चाचेर, विसापूर
आदि गावांतील परिसरात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या ठप्प झाल्या आहेत.
रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. त्यापाठोपाठ मृगही कोरडे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहे. मृग
नक्षत्र लागून आठ-दहा दिवस होत आले तरी पावसाचे कोणतेही वातावरण दिसून येत नाही. दिवसभर नुसता वारा वाहत आहे. आकाशात काही प्रमाणात ढगही जमा होत आहेत.
जोरदार पाऊस पडावा म्हणून देवाची प्रार्थना करीत आहेत. सकाळी उठल्यावर शेतकऱ्यांमध्ये पावसावर चर्चा होताना दिसून येत आहे. आज ना उद्या पाऊस येईल याची आस बळीराजाला लागली आहे. ज्या शेतकऱ्याकडे थोड्याफार प्रमाणात विहिरींना पाणी आहे. अशा शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी केली आहे.
सध्या शेतकऱ्याकडे पैसे नाही तरी त्याने खरिपासाठी हात-
उसनवार करीत शेतकऱ्याने पेरणीसाठी बी-बियाणे घेऊन ठेवले आहे. जर एवढ्या आठ-दहा दिवसामध्ये पाऊस झाला नाही तर बियाणे वाया जाते की काय याची चिंता शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)