बागलाण भाजपा तालुकाध्यक्ष संघटनमंत्री ठरविणार
By admin | Published: January 10, 2016 10:14 PM2016-01-10T22:14:23+5:302016-01-10T22:32:05+5:30
बागलाण भाजपा तालुकाध्यक्ष संघटनमंत्री ठरविणार
सटाणा : संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदाच्या शर्यतीत तब्बल १८ इच्छुकांनी तालुकाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी इच्छुकांमधून १५ नावे वगळून तीन नावे पुढे आणल्याने अध्यक्षपदाची निवडप्रक्रि याच चिघळून त्याला गालबोट लागल्याने पक्ष निरीक्षक सचिन पाटील यांनी अध्यक्ष निवडीच्या निर्णयाचा चेंडू आता प्रदेश संघटनमंत्र्यांच्या कोर्टात फेकला आहे. त्यामुळे संघटनमंत्री अध्यक्षपदाचा टिळा कुणाच्या कपाळाला लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तालुक्यासाठी भाजपाला अनेक महिन्यांपासून तालुकाध्यक्षपदाची प्रतीक्षा होती. भाजपाच्या तालुकाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहावर पक्ष निरीक्षक सचिन पाटील व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते व तालुक्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या विशेष बैठकीत तब्बल १८ कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार इच्छुकांच्या उशिरापर्यंत मुलाखती घेण्यात
आल्या. (वार्ताहर)
प्रत्येकाने अध्यक्षपदावर दावा केला. त्यामुळे निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले. अण्णा सावंत, शरद सावंत, भाऊसाहेब अहिरे, गजेंद्र चव्हाण, प्रकाश कुमावत, संदीप खैरनार, लक्ष्मण मांडवडे, कृष्णा भामरे, मंगेश पवार, डॉ. शेखर मुळे, कण्हू गायकवाड, रुपेश शहा, गोरख बच्छाव, हेमंत देवरे, संजय भामरे, किरण ठाकरे आदिंनी तालुकाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली. यापैकी पंधरा इच्छुकांची नावे वगळून अण्णा सावंत, संजय भामरे व शरद सावंत या तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची अधिकृत माहिती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिल्याने अन्य इच्छुकांनी आमची अध्यक्षपदासाठी कुवत नाही का, असा सवाल करून एकच गोंधळ घातला. या गोंधळामुळे निवडप्रक्रि या चिघळून त्याला गालबोट लागण्याचा प्रयत्न झाल्याने पक्ष निरीक्षक पाटील यांनी इच्छुकांची नाराजी काढण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेली तिघांची नावे प्रदेश संघटनमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असून, ते आपला निर्णय जाहीर करतील अशी भूमिका पाटील यांनी घेतल्याने वादावर पडदा पडला. आगामी दोन दिवसांत संघटनमंत्री आपला निर्णय देतील, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संघटनमंत्री तिघांपैकी कुणाला प्रसन्न होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याप्रसंगी डॉ. विलास बच्छाव, कोषाध्यक्ष गोविंद कोठावदे, डॉ. शेषराव पाटील, नगरसेवक साहेबराव सोनवणे, बिंदू शर्मा, जि. प. सदस्य सुनीता पाटील, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे,अण्णा अहिरे, सी. एन. पाटील, श्याम मराठे, प्रदीप कांकरिया, देवेंद्र जाधव, प्रशांत कोठावदे, संजय देवरे, पंकज ततार, मुन्ना शेख, सईद मुल्ला, श्याम लोखंडे, अतुल पवार, दामूनाना नंदाळे, मंगेश खैरनार, बबन गुंजाळ, चंद्रसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत मानकर आदिंसह तीनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
काल अध्यक्षपदासाठी आयोजित निवड समितीच्या बैठकीत अनेक कार्यकत्यांनी अध्यक्ष निवडताना पक्षनिष्ठेचा कस लावा, अशी उघड चर्चा काही कार्यकर्त्यांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या चर्चेला बहुतांश उपस्थितांनी बगल देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. माजी आमदार दिलीप बोरसे यांचे तिकीट कापण्यासाठी पक्षातीलच काही शक्तींनी प्रयत्न केला होता, तर काही मंडळींनी बोरसे यांना तिकीट मिळावे म्हणून मुंबईच्या वाऱ्यादेखील केल्या आणि उमेदवारांच्या पहिल्याच यादीत बोरसे यांचे नावदेखील जाहीर झाले. मात्र अखेरच्या क्षणी निष्ठेच्या गप्पा मारणारेदेखील भूमिगत होऊन उमेदवाराला अक्षरश: वाऱ्यावर सोडले. त्यामुळे कालच्या बैठकीत पक्षनिष्ठेचा कस लावा अशी मागणी केल्याने अशा मंडळींचे चेहरेच पडल्याचे दिसून आल्याची एकच चर्चा रंगली होती.