बागलाणला झिरपले ‘विनायकाच्या’ निधीचे पाझर
By admin | Published: October 1, 2015 12:14 AM2015-10-01T00:14:01+5:302015-10-01T00:14:42+5:30
लाखोंचा निधी एकाच तालुक्यात : जलयुक्त शिवार अभियानाची किमया
नाशिक : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनेक गमतीजमती आता बाहेर येऊ लागल्या असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सामाजिक संस्था व विश्वस्त मंडळांनी केलेली ‘सढळ’ हाताने मदत, त्याच तत्परतेने ठरावीक तालुक्यात पळविण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे.
नाशिक जिल्ह्णासाठी मुंबईस्थित एका प्रख्यात न्यासाने दिलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतील सुमारे ६५ लाखांहून अधिकची रक्कम चार बंधाऱ्यांच्या कामापोटी एकट्या बागलाण तालुक्यातच ‘झिरपल्याने’ त्याविषयी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्णातील २२९ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात सीमेंट प्लग बंधारे, कोटा बंधारे तसेच अन्य जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. हे अभियान यशस्वी होण्यासाठी शासनाने लोकसहभागही वाढविला असून, सरकारी तिजोरीतील खडखडाटामुळे या योजनेसाठी सामाजिक संस्था, कंपन्या, न्यास व विश्वस्त संस्था यांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शिर्डी, मुंबईसह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून जलयुक्त शिवार अभियानासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबईस्थित अशाच एका सामाजिक न्यासाकडून नाशिक जिल्ह्णातील जलयुक्त शिवार अभियानासाठी सुमारे एक कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निधी जिल्हा परिषदेकडे जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग केला. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने या निधीपैकी तब्बल ६७ लाखांचा निधी बागलाण तालुक्यातील चार बंधाऱ्यांच्या कामांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वास्तविक पाहता जिल्ह्णात सिन्नर, येवला, नांदगाव व मालेगावसह काही तालुक्यांत आता आतापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच या तालुक्यांतील काही भागात बाराही महिने दुष्काळ पाचवीला पूजलेला असूनही लाखोंचा निधी एकट्या बागलाण तालुक्यातच कसा ‘झिरपला’ अशी चर्चा सदस्यांमध्ये आहे. काही सदस्यांनी बागलाण तालुक्यात गेलेल्या या न्यासाच्या निधीची चौकशीची मागणी केल्याने जलयुक्त शिवार अभियान चर्चेत आले आहे.(प्रतिनिधी)