बागलाण : पाणी कमी पडू लागल्याचा परिणाम कांदा पिकात फिरवला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:16 AM2018-04-04T00:16:05+5:302018-04-04T00:16:05+5:30
औंदाणे : उशिरा लागवड केलेला उन्हाळी कांदा पाण्याअभावी करपल्याने येथील यशोधन काकाजी निकम या शेतकऱ्याने अर्धा एकर कांद्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर फिरवत पीक सोडून दिले.
औंदाणे : उशिरा लागवड केलेला उन्हाळी कांदा पाण्याअभावी करपल्याने येथील यशोधन काकाजी निकम या शेतकऱ्याने अर्धा एकर कांद्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर फिरवत पीक सोडून दिले. डाळिंबाप्रमाणे कमी पाण्यात उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने निकम यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली. परंतु ऐन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने हे पीक पोसले गेले नाही. भूजल पातळी खालावली आहे. सध्या उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. येथील सर्वच शेती डोंगरपायथ्याशी आहे. डोंगरावर पाऊस पडूनही पाणी अडविण्याची व्यवस्था नाही. उन्हाची तीव्रता वाढत असून, विहिरी आटू लागल्या आहेत. त्यामुळे कांद्याला पाण्याचा फटका बसला आहे. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. केळझर चारी क्रमांक ८ चे काम अपूर्णावस्थेत असल्याने हे काम पूर्ण झाल्यास विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.