जिम्मी राजपूतसह कोल्हे यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:18 AM2021-12-08T01:18:59+5:302021-12-08T01:20:00+5:30
जागेच्या वादातून गेल्या फेब्रुवारीमध्ये वृद्ध भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील संशयित बाळासाहेब बारकू कोल्हे, तसेच जिम्मी राजपूत या दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी (दि.७) मंजूर केला, तर उर्वरित दोघांचा अर्ज फेटाळून लावला. संशयित कोल्हे यांच्यावरही मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती.
नाशिक : जागेच्या वादातून गेल्या फेब्रुवारीमध्ये वृद्ध भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील संशयित बाळासाहेब बारकू कोल्हे, तसेच जिम्मी राजपूत या दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी (दि.७) मंजूर केला, तर उर्वरित दोघांचा अर्ज फेटाळून लावला. संशयित कोल्हे यांच्यावरही मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती.
आनंदवली येथे मंडलिक यांच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे २२ संशयितांची टोळी गजाआड केली आहे. या भूमाफियांच्या टोळीचा मास्टरमाइन्ड रम्मी राजपूतलाही पोलिसांनी अटक केली. टोळीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करत आर्थिक रसद पुरविण्याचा ठपका संशयित कोल्हेविरुद्ध ठेवण्यात आला आहे. या टोळीने मंडलिक यांच्या खुनाचा पूर्वनियोजित कट रचून १७ फेब्रुवारी, २०२१ रोजी त्यांना ठार मारल्याच फिर्यादीत विशाल मंडलिक यांनी म्हटले आहे. या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात २२ संशयितांच्या टोळीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सखोल तपासात टोळीने या आधीही दमदाटी, धमकावून जागा बळकावल्याचे समोर आले. त्यामुळे टोळीतील गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. त्यात गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांसोबतच कट रचणारे, गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांसह खुनाचा गुन्हा घडल्यानंतर, संशयितांना राज्याबाहेर पळवून जाण्यास मदत करणाऱ्यांचा संशयितांमध्ये समावेश होता. यानंतर, या टोळीतील काही संशयितांनी जामिनासाठी अर्ज केले होते. त्यानुसार, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन संशयित बाळासाहेब कोल्हे आणि जिम्मी राजपूत यास न्यायालयाने जामीन मंजूर केला, तसेच संशयित गोकुळ काशिनाथ आव्हाड, गणेश भाऊसाहेब काळे व हितेश उगलसिंग यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.