मणप्पुरम दरोड्यातील संशयितास जामीन
By admin | Published: February 5, 2015 12:00 AM2015-02-05T00:00:47+5:302015-02-05T00:01:00+5:30
मणप्पुरम दरोड्यातील संशयितास जामीन
नाशिक : बिटको चौकातील प्रतीक आर्केडमधील ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’वर पाच जणांनी सिनेस्टाईल सशस्त्र दरोडा टाकून सतरा किलो सोने व तीन लाखांची रोकड असा कोट्यवधींचा ऐवज लुटून नेल्याची घटना १ आॅक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी घडली होती़ या लूट प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला टोळीचा म्होरक्या राजदत्त राणे यास उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती साधना जाधव यांनी जामीन मंजूर केला आहे़ संशयित राणेच्या वतीने अॅड़ अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला़ या टोळीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता़ यानंतर संशयित राणे याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता़
राणेचे वकील अनिकेत निकम यांनी संशयित राजदत्त राणेची बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, राणेने हा दरोडा टाकलेला नसून या कटात सामीलही नाही़ तसेच कुठल्याही साक्षीदाराने राणेला ओळखलेले नाही़ पोलिसांनी ज्या जागेवरून सोने हस्तगत केलेले आहे त्या जागेशी त्याचा संबंध नाही़ जप्तीची प्रक्रिया ही सेक्शन २७ आॅफ एविडन्सनुसार नाही, तसेच पोलिसांनी ज्या पंचांची मदत घेऊन सोने जप्त केलेले आहे ते सराईत आहेत. त्यामुळे ही सर्व प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे न्यायालयास सांगितले़ अॅड़ निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने हा राणेचा जामीन मंजूर केला़ (प्रतिनिधी)