बैलजोडी चक्क तीन हजारांना...
By Admin | Published: August 27, 2016 11:48 PM2016-08-27T23:48:52+5:302016-08-27T23:49:54+5:30
उत्सव बळीराजाचा : पीओपीच्या बैलांची भुरळ; सजावटीच्या साहित्यांची थाटली दुकाने
नाशिक : बळीराजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेला पोळ्याचा सण येत्या गुरुवारी (दि.२७) साजरा होणार आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत लगबग पहावयास मिळत आहे. मातीच्या बैलांबरोबरच पीओपीच्या बैलांचीही भुरळ नागरिकांना पडत आहे. पीओपीच्या आकर्षक मोठी बैलजोडीची किंमत सुमारे साडेतीन हजारांपर्यंत आहे.
वर्षभर काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या मुक्या सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जवळ येत असून महाराष्ट्राचा उत्सव बैलपोळा साजरा करण्यासाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला आहे. शहरात गणेश चतुर्थीबरोबरच पोळ्याचीही लगबग दिसत आहे. बैलजोडी सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रीची दुकाने रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, निमाणी परिसरात थाटण्यात आली आहे. एकूणच यंदा पोळा, गणेशोत्सव हे दोन्ही सण एकापाठोपाठ साजरे होत असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे ते पोळ्याच्या मुहूर्तावर आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ मानून बैलजोडीची पूजा करतात. यावेळी सुवासिनींकडून बैलांची पूजा करत एकप्रकारे जणू आशीर्वादच घेतला जातो. पोळ्याचा उत्सव महाराष्ट्रात गणेशोत्सवाप्रमाणेच उत्साहात साजरा केला जातो. शहरी भागात पोळ्याचा उत्साह कमी जरी जाणवत असला तरी शहराला लागून असलेल्या खेड्यांमध्ये पोळा जणू दिवाळीप्रमाणेच साजरा होतो.
तीन दिवसांवर पोळ्याचा सण येऊन ठेपल्याने बाजारपेठेत बैलांच्या शिंगांपासून तर पायांच्या खुरापर्यंत सजावट करण्याचे विविध साहित्य, रंग उपलब्ध झाले आहेत. नागरिक घराघरांमध्ये मातीची बैलजोडी खरेदी करून पूजा केली जाते.
यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मातीचे बैल विक्रीस आले आहेत. याबरोबरच पीओपीपासून तयार केलेल्या बैलांचेही नागरिकांना आकर्षण असून काळानुरूप मातीच्या बैलांचेही रूप बदलत आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर करत मातीपासून तयार करण्यात आलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर्षी मातीच्या बैलांसह पीओपीच्या बैलांनाही मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जुना गंगापूर नाका येथील एका मातीच्या वस्तू विक्रीच्या दुकानात पीओपीपासून तयार केलेल्या बैलजोडीची किंमत आकारानुसार आहे. (प्रतिनिधी)