आमिष गृहोद्योगाचे, वापर शक्तिप्रदर्शनासाठी
By admin | Published: December 4, 2014 12:37 AM2014-12-04T00:37:08+5:302014-12-04T00:37:19+5:30
महिलांचा फसवणुकीचा आरोप : कथित संघटनेच्या प्रमुखाचा प्रवेश सोहळा; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे घूमजाव
नाशिक : शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रवेशाचे अनेक सोहळे यापूर्वी नाशिककरांनी पाहिले असतील; परंतु बुधवारी शक्तिप्रदर्शनाचा अजब नमुना सर्वांनाच चक्रावून सोडणारा ठरला़ अपरिचित अशा आक्रमण संघटनेच्या नेत्याने शक्कल लढवत हजारो महिलांना नाशकात गृहोद्योगाचे आमिष दाखवत आणले खरे; परंतु आपला वापर पक्षप्रवेशासाठी शक्तिप्रदर्शनाकरिता होत असल्याची मेख संबंधित महिलांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली़ संबंधित नेत्याचा हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या नेत्यासमक्ष घडत असताना आणि महिलांनीही त्यासंबंधी आरोपाच्या फैरी झाडल्या असताना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सारवासारव करीत चुप्पी साधली़
शहराच्या विविध भागांतील गृहिणींना चॉकलेट, मसाला, पापड, चपात्या लाटणे आदिंच्या माध्यमातून रोजगार मिळेल असे सांगत आक्रमण या संघटनेने सभासद करून घेतले़ यासाठी पन्नास रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंत फी घेण्यात आल्याचे महिलांनी सांगितले़ हजारोंच्या संख्येने सदस्य झालेल्या या महिलांना प्रशिक्षण व मेळाव्याच्या नावाखाली बुधवारी आक्रमण संघटनेचे नेते संतोष शर्मा याने बी़ डी़ भालेकर मैदानावर येण्यास सांगितले़ त्यासाठी सुमारे पन्नास ते साठ आयशर गाड्यांची व्यवस्थाही केली़ मेळाव्याला येणाऱ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले जातील, प्रशिक्षण दिले जाईल, ज्या महिला येणार नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातील, त्यांना काम मिळणार नाही, असेही सांगितले गेले़ यामुळे हजारोंच्या संख्येने महिला आपल्या लहानग्यांसह जमा झाल्या़
यानंतर संघटनेने आलेल्या महिलांना प्रशिक्षण वा मेळावा न घेता रॅली काढून ती राष्ट्रवादी भवन येथे नेली़ यामध्ये आपला (राजकीय) मोर्चासाठी उपयोग केला जात असल्याचे पाहून काही महिलांनी मैदानावरच थांबण्यात धन्यता मानून संघटनेवर फसवणुकीचे आरोप केले़ राष्ट्रवादी भवनजवळ मोर्चा गेल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे व जिल्हाध्यक्ष अॅड़ रवींद्र पगार यांनी या नेत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत येण्याचे आवतन दिले़
या कार्यक्रमानंतर महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार कानावर येताच या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रवेशाचा निर्णय भुजबळसाहेब घेतील असे सांगून घूमजाव करीत संघटनेच्या फसवणुकीशी राष्ट्रवादीचा संबंध नसल्याचे जाहीर करून टाकले़ अशा प्रकारे एका संघटनेने मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करण्यापूर्वी केलेल्या शक्तिप्रदर्शनाचे अनोखे उदाहरण शहरवासीयांना बुधवारी पाहायला मिळाले़ (प्रतिनिधी)