बकरी ईद : शेकडो मुस्लीमांचे ईदगाहवर सामुदायिकरित्या नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:20 PM2018-08-22T14:20:51+5:302018-08-22T14:23:41+5:30
बुधवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांची पावले ईदगाह मैदानाच्या दिशेने वळू लागली होती. सकाळी हलक्या सरींचा काही मिनिटे वर्षाव झाला; मात्र त्यानंतर चक्क सुर्यप्रकाश पडल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला.
नाशिक : त्याग, समर्पण, बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण ईद-ऊल-अज्हा अर्थात बकरी ईद बुधवारी (दि.२२) नाशिक शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची दमदार संततधारेने सकाळपासून उघडीप दिल्याने मोठ्या उत्साहात व अल्हाददायक वातावरणात शेकडो मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पध्दतीने शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सामुदायिकरित्या नमाजपठण केले.
दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने ईदगाह मैदानावर नमाजपठणाचा सोहळा होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता; मात्र पुर्वसंध्येलाच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, हाजी मीर मुख्तार अशरफी यांनी पाहणी करुन नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार बुधवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांची पावले ईदगाह मैदानाच्या दिशेने वळू लागली होती. सकाळी हलक्या सरींचा काही मिनिटे वर्षाव झाला; मात्र त्यानंतर चक्क सुर्यप्रकाश पडल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला. अधुनमधुन सुर्यप्रकाशाची किरणे तर पुन्हा ढगांची गर्दी अन् थंड वारा अशा अल्हाददायक नैसर्गिक वातावरणात उपस्थित शेकडो बांधवांनी नमाजपठण केले. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार ‘ईद’चे नमाजपठण मोकळ्या आकाशाखाली मैदानात केले जाते, असे यावेळी धर्मगुरूंनी सांगितले.
प्रारंभी साडेनऊ वाजता धर्मगुरू मौलाना महेबुब आलम यांनी प्रवचनातून बकरी ईदची पार्श्वभूमी आणि महत्त्व विषद केले. त्यानंतर खतीब यांनी उपस्थितांना ईदच्या विशेष नमाजपठणाची पध्दत नेहमीप्रमाणे सांगितली. दहा वाजून पाच मिनिटाला नमाजपठणाला सुरूवात झाली. पंधरा ते वीस मिनिटांत नमाजपठण पुर्ण झाले. त्यानंतर खतीब यांनी ईदचा विशेष ‘खुतबा’ अरबी भाषेतून पारंपरिक पध्दतीने वाचला. तसेच संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. त्यांना ‘आमीन’ म्हणत उपस्थितांनी होकार दिला. दरम्यान, इस्लामचे अंतीम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामुहिक पठण करुन साडेदहा वाजेच्या सुमारास सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळ्याचे संपुर्ण सुत्रसंचालन ईदगाह समितीचे प्रमुख कार्यवाह हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले.यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पारंपरिक पोशाखासोबत रेनकोट अन् छत्री
पारंपरिक पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी परिधान करून विशेष श्लोक (तस्बीह) पठण करत घरातून मुस्लीमबांधव ईदगाहच्या दिशेने निघाले. यावेळी पावसाची शक्यता असल्याचे गृहित धरुन अबालवृध्दांनी रेनकोट, छत्री, मैदानावर बसण्यासाठी पाणकापड, प्लॅस्टिक व बांबू चटाईदेखील सोबत घेतली होती. प्रवचन सुरू असताना हलक्या सरींचा वाऱ्यासोबत वर्षाव सुरू होताच मैदानावर बसलेल्या जनसमुदायाने छत्र्यांचा आधार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.
‘केरळ’च्या पुरग्रस्तांना नाशिकच्या मुस्लीमांचा मदतीचा हात
देशभरात कोठेही नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास तेथील रहिवाशांना मदतीचा हात देण्यासाठी नाशिकच्या मुस्लीम समुदायाकडून सय्यद सादिकशाह हुसेनी रिलिफ फंड नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून केरळ पुरग्रस्तांसाठी नमाजपठणाच्या सोहळ्यादरम्यान ईदगाहवर मदतनिधी उभारण्यात आला. नमाजपठणासाठी मोठ्या संख्येन उपस्थित राहिलेल्या समाजबांधवांनी आपआपल्या परीने संस्थेच्या स्वयंसेवकांकडे आर्थिक स्वरुपात दान दिले. केरळच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदतनिधी संकलित करण्यात आला.