संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:51 PM2020-02-25T23:51:07+5:302020-02-26T00:10:29+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व संघटन मंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांचे मंगळवारी मध्यरात्री एक वाजता श्री गुरु जी रु ग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व संघटन मंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांचे मंगळवारी मध्यरात्री एक वाजता श्री गुरु जी रु ग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
नाशिकमधील संघाचे सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांना मान होता. कृषिनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे ते निवासी होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारीही होते. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये आले तेव्हा त्यांनी बाळासाहेब यांची कृषीनगर येथे वनवासी कल्याण आश्रमातच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. १९५४ पासून संघ प्रचारक म्हणून त्यांनी कामाला प्रारंभ केला. सुरुवातीला सोलापूर, पंढरपूर, बार्शी येथे त्यांनी काम केले. त्यानंतर १९५६ ते १९७३ अशी १७ वर्षे तेथे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघ विचार रूजवले आणि धारशिवसह (आत्ताचे उस्मानाबाद) मराठवाड्यात संघ शाखांचे जाळे विणले. १९७७ मध्ये आणीबाणीच्या कालावधीत त्यांनी तुरुं गवास भोगला. त्यानंतर १९७८ साली स्थापन झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे ते प्रांत संघटनमंत्री म्हणून नियुक्त झाले. १९९२ मध्ये लातूर येथे झालेल्या भूकंपानंतर किल्लारी येथे पुनर्वसन कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. महाराष्टÑ प्रांत संघटनमंत्री, क्षेत्र संघटनमंत्री, पूर्णवेळ कार्यकर्ता प्रमुख, अखिल भारतीय छात्रावास प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
७ मार्चला शोकसभा
बाळासाहेब दीक्षित यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत्या ७ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलातील नानासाहेब ढोबळे सभागृहात शोकसभा होणार आहे.