राजकीय हवामान न मानवल्याने बाळासाहेब पुन्हा भाजपत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:38+5:302020-12-22T04:14:38+5:30
ऐन भरात असलेल्या भाजपचे आमदार आणि शहराध्यक्षपदासारखी सर्व सत्ता एकहाती एकवटल्यानंतरदेखील ती संयमाने सांभाळणे न जमल्याने अखेरीस त्याची परिणीती ...
ऐन भरात असलेल्या भाजपचे आमदार आणि शहराध्यक्षपदासारखी सर्व सत्ता एकहाती एकवटल्यानंतरदेखील ती संयमाने सांभाळणे न जमल्याने अखेरीस त्याची परिणीती सानप यांची विधानसभेची उमेदवारी जाण्यावर झाली. त्यावेळी लढण्याच्या खूप ईर्षेने पेटलेल्या बाळासाहेब सानप यांनी तत्काळ राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटी बांधले तरी त्या घड्याळाच्या काट्यांच्या वेगाने इप्सित साध्य होणे सहजशक्य नव्हते. म्हणून निवडणुकीतील पराभवानंतर तत्काळ त्यांनी पक्ष बदल केला. आणि शिवबंधन हाती बांधले. भाजपला खिजवण्यासाठी शिवसेनेची खेळी असली तरी आता या पक्षातदेखील झटपट पुढे सोपे नाही. विधान परिषद आणि महानगरप्रमुख या दृष्टिपथातील दोन संधी हुकल्याचे दिसताच सानप यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असला तरी तो सहजासहजी झालेला नाही. पक्षातील बहुतांशांचा विरोध असतानाही संघ परिवाराच्या जवळकीतून पुन्हा घरी परतणे झाले. म्हणजे पुन्हा माघारी परतल्यासारखेच झाले. सोमवारी (दि.२१) मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सेाहळा झाला असला तरी स्थानिक पातळीवरील बहुतांश आमदारांची आणि अन्य नेत्यांची गैरहजेरी बरेच काही सांगून गेली. केवळ राज्यस्तरावर तुम्ही खडसे घेतले तर आम्ही सानप परत मिळवले, अशा आविर्भावात भाजपने जे वातारण केले, त्यातून त्याच गेाष्टीची चर्चा रंगली. विरोधाची नाही.
इन्फो..
गिरीश महाजन हे पालकमंत्री नसले तरी नाशिकची सूत्रे त्यांच्याकडेच आहेत. मात्र अलीकडे त्यात बदल करून पक्षाने माजी मंत्री जयकुमार गोयल यांना महानगर प्रभारीपदी नियुक्त केले. ते नाशकात येत नाही तोच सानप यांचा भाजपत प्रवेश झाला. या सर्व घटनाक्रमांना एकाच फेरबदलाच्या आणि विशेष करून महाजन यांच्या कडील जबाबदारी बदलानंतरचे नाट्य म्हणून बघितले गेले तरी प्रत्यक्षात मात्र मुंबईतील सोहळ्याला गिरीश महाजन आवर्जून उपस्थित होते आणि सानपही त्यांच्या शेजारीच आसनस्थ होते.